2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ही बाब लक्षात घेऊन आपआपल्या जिल्ह्यातील छोटय़ा पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या आणि गाव तसेच शहरातील छोटे पक्ष संपवा, असे थेट आवाहन (BJP)भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नागपुरातील मेळाव्यात बावनकुळे बोलत होते. नागपुरातील वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी आयोजित या मेळाव्याला केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते, आमदार प्रवीण दटके उपस्थित होते. यावेळी बावनकुळे म्हणाले, विविध राजकीय पक्षांचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे प्रत्येक बुथ प्रमुखांनी आपआपल्या जिल्ह्यातील जे छोटे पक्ष असतील अशा राजकीय पक्षातील किमान 50 पदाधिकांऱ्यांना आपल्या पक्षात घ्यावे आणि छोटे पक्ष संपवावे. मला काय दिले यापेक्षा पक्षासाठी मी काय करु शकतो याचा विचार प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी करावा. आपल्या गळय़ातील दुपट्टा हेच आपल्यासाठी प्रमाणपत्र आहे. पक्षावर किंवा नेत्यावर नाराज होऊन काही उपयोग नाही. आपण नाराज असाल आणि काम करत नसाल तर आपली जागा दुसरे कुणी तरी घेईल. प्रत्येक आमदाराने 15 हजार तर खासदारांनी 30 हजार लोकांपर्यत नमो अॅप पोहचवा, असेही बावनकुळे म्हणाले.मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.