केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बांधलेले उड्डाणपूल व महामार्गांची भरभरून चर्चा होते. पोटातील पाणी हलणार नाही, असे गुळगुळीत रस्ते झाल्याचा दावा खुद्द नितीन गडकरी करतात. शंभर वर्षे या कामांना काहीच गालबोट लागणार नाही, असाही दावा होत असतो. मात्र, हा दावा फोल करणारा एक भयावह प्रकार उजेडात आला आहे आणि तोही नितीन गडकरी यांच्याच विदर्भात. या प्रकारामुळे नागरिक चिंतेत पडले आहे.
हिंगणघाट येथून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक ४४ वरील रस्त्यावर नांदगाव चौक आहे. या ठिकाणी असलेल्या शिवाजी महाराज उड्डाणपूलावर मोठा खड्डा पडला आहे. रस्त्याच्या अगदी मधोमध पडलेल्या या खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले. दुचाकी उसळून अनेक आपटले, जखमी झालेत, मात्र उड्डाणपुलाची दुरुस्ती झालेली नाहीच. महामार्गावरील वाहतुकीस यामुळे अडथळे निर्माण होतात. वाहनचालकांना हा खड्डा चुकवून गाडी चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. या खड्ड्यामुळे पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. त्यावर तात्पुरते जाड खर्डे ठेवण्यात आले. मात्र तरीही खड्डा झाकल्या जात नाही. म्हणून कुणाचा जीव जाण्याची वाट प्रशासन बघते कां, असा प्रश्न संतप्त नागरिक सोशल मीडियावर उपस्थित करीत आहेत.
या महामार्गावरील उड्डाणपुलावरून प्रामुख्याने जड वाहने धावतात. तसेच विस्तीर्ण महामार्ग असल्याने चारचाकी वाहने सुसाट धावतात. काही काळ सुरक्षा कठडे दिसले, पण ते पुरेसे नसल्याची ओरड होत आहे. कारण वाहतूक नियमांचे पालन होत नाही. यावर त्वरित दुरुस्ती काम होणार असल्याचे सांगण्यात येते. पण हे काम काही सुरू झालेले नाही. हे काम म्हणजे निकृष्ट बांधकामाचा उत्तम नमुना असल्याची टीकाही सुरू झाली. मात्र, प्रशासन जणू काही कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे एकूणच ढिम्म कारभार पहायला मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेत संताप वाढत चालला आहे.
अलीकडच्या काळात भव्य महामार्ग तसेच उड्डाणंपुलांची बांधकामे झालीत. त्यामुळे वाहतूक सुकर झाल्याने नागरिक सुखावले. पण आता खड्डे पडणे, पथदिवे बंद असणे, वाहतूक नियमनाचा अभाव, असे व अन्य प्रकार डोकेदुखी ठरत आहेत. बांधकामापश्चात यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा कुठे गेली, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.