Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांच्या त्रासामुळे आत्महत्या करणार : उपजिल्हाधिकाऱ्यांची तक्रार

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांचे ‘वजन’ वाढताच पुण्याचे ‘कलेक्टर’ झालेल्या सुहास दिवसेंवर त्यांच्याच ‘टीम’मधील प्रांताधिकारी(उपजिल्हाधिकारी)जोगेंद्र कट्यारे यांनी गंभीर आरोप केले. ‘राष्ट्रवादीच्या एका आमदाराच्या सांगण्यावरून दिवसे हे मानसिक छळ करीत आहेत. दिवसेंच्या (Suhas Diwase) त्रासामुळे माझ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे, असे जाहीरपणे सांगून कट्यारे यांनी प्रशासनात खळबळ उडवून दिली आहे.

 

गंभीर म्हणजे, दिवसेंविरोधात तक्रारींचा सूर ठेवणाऱ्या कट्यारेंनी थेट राज्याचे मुख्य सचिव आणि निवडणूक आयोगाला पत्र धाडले आहे. कट्यारे यांच्यासारख्या अधिकाऱ्यानेच दिवसेंविरोधात तक्रारींचा पाढा वाचल्याने दिवसे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते आणि दिवसे हे ठरवून त्रास देत असल्याचेही कट्यारे यांनी पत्रात म्हटले आहे.

 

आमदार मोहिते यांची कामे करीत नसल्यानेच ही वेळ आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. म्हणजे, अजित पवारांचे समर्थक आमदार मोहिते आणि दिवसे हे जाणीवपूर्वक त्रास देत असल्याची बाब कट्यारे यांच्या पत्रातून दिसते. परिणामी, या प्रकरणाची चौकशी होऊन नेमके सत्य बाहेर येईल मात्र, त्याआधी या ‘व्हायरल’ पत्रामुळे जिल्हा प्रशासनाच्या कारभाराची चर्चा होत आहे.

 

दिवसेंविरोधात तक्रारींवर महसूल खात्याचे मुख्य सचिव काय भूमिका घेणार, याकडेही लक्ष असेन. त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दिवसे आणि कट्यारे यांच्या वादावर काय बोलणार, हेही महत्त्वाचे आहे. या पत्रात थेट दिवसेंच्या नावाचा उल्लेख असल्याने त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी ‘सरकारनामा’च्या प्रतिनिधींनी त्यांच्या मोबाईलवर फोन केला. परंतु, दिवसे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, मीडियात या पत्राची जोरात चर्चा होत लागल्याने आज ना उद्या दिवसेंना आपली बाजू मांडावीच लागणार आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही दिवस बाकी असताना पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी गंभीर आरोप केल्याने प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कट्यारे यांनी थेट निवडणूक आयोग आणि राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या सांगण्यावरुन दिवसे त्रास देत असल्याचे कट्यारे यांनी पत्रात नमूद केले आहे.

 

लोकसभा निवडणुकीच्या काळात पुणे (Pune) रिंग रोड कामाबाबत चौकशी समिती लावून या चौकशीत गुंतवुन ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची चुकीची कामे आणि आर्थिक मागणी पूर्ण करीत नसल्याने माझ्याविरोधात वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. आता हे सर्व सहन होत नसल्याचे म्हणत आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. कट्यारे यांनी या पत्रात दिवसे आणि मोहिते पाटलांबाबत तक्रारींचा पाढा वाचला आहे.

 

ते मला मानसिक त्रास देतात

जिल्हाधिकारी म्हणून सुहास दिवसे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर मला लक्ष्य करुन त्रास देत आहेत. लोकसभा निवडणूक काळात या निवडणूक अधिकारी असलेले दिवसे मला वारंवार अपमानित करण्याची संधी सोडत नाहीत. वास्तविक मी यापुर्वी त्यांच्या हाताखाली प्रत्यक्ष कधीच काम केलेले नाही. त्यामुळे केवळ विद्यमान लोकप्रतिनिधी त्यांना जे सांगतात तेच खरे असे ग्राह्य धरुन ते मला मानसिक त्रास देत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी माझ्याकडेपूर्व चक्राकार मार्गाचा खेड तालुक्याचा कार्यभार कोणतेही खात्री न करता केवळ विद्यमान लोकप्रतिनिधी यांचे ऐकूण अचानकपणे काढून घेतलेला आहे, असे कट्यारे यांनी पत्रात म्हटले आहे.

 

गेले 23 वर्षे मी सरकारी सेवेत असून आतापर्यंत माझ्या सोबत कोणतेही जिल्हाधिकारी असे वागलेले नाहीत. दिलीप मोहिते यांच्या आर्थिक बाबीची पूर्तता करीत नसल्याने व त्यांचे बेकायदा कामे करीत नसल्याने माझ्याविरुध्द सप्टेंबर 2023 पासून नेहमीच तक्रारी करीत आहेत.

 

आमदाराशी जवळीक

अर्थातच एका अधिकाऱ्याचे कामकाज न पाहताच त्याविषयी गैरसमज करुन घेऊन त्याचे प्रशासकीय व वैयक्तिक आयुष्य खराब करण्यासाठी जिल्हाधिकारी लोकप्रतिनिधीचे ऐकत आहे, ही बाब निश्चितच अशोभनीय आहे. निवडणूक काळात माझ्या वैयक्तिक कामात लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळतो आहे, हेच त्यांचे आमदारांशी घनिष्ठ संबंध असल्याचे सिध्द करते. निवडणूक काळात आचारसंहिता असतांना आमदार मोहिते आणि दिवसे यांच्या नेहमीच गाठीभेटी होत आहेत, यामुळे आचारसंहिता भंग होत असल्याचे कट्यारे यांनी निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिले.

 

शिंदे-फडणवीसांच्या सरकारला साथ दिल्यानंतर आणि उपमुख्यमंत्रीपदावर बसलेल्या अजित पवारांकडे पुण्याचे पालकमंत्रीपद आले. त्यानंतर अजित पवारांनी प्रशासकीय यंत्रणेवर नव्याने पकड ठेवली. त्यात पुण्याच्या कलेक्टरांपासून महापालिका आयुक्तही आपल्याच मर्जीत आणून बसवले. त्यातून ‘पीएमआरडी’चे आयुक्तपद गेल्यानंतर सुहास दिवसेंकडे राज्याच्या क्रीडा खात्याची जबाबदारी आली. तेव्हा ते पुण्यातच राहिले. मात्र, अजित पवारांच्या पुढाकारातून दिवसे हे कलेक्टर झाले.

 

अजित पवारांच्या जवळचे असल्याने जिल्हा प्रशासनात दिवसेंचा दबदबा आहे. ते अजित पवारांच्या आमदारांना ‘फेवर’ असल्याची चर्चा असते. त्यामुळे खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि दिवसेंची जवळीक असल्याचेही बोलले जाते. हीच बाब कट्यारे यांनीही पत्रात उघड करण्याचा प्रयत्न केला आहे.

About विश्व भारत

Check Also

पावसाचे थैमान : नागपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर

विदर्भात (Vidarbha) आज सकाळपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र …

आमदाराने तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांना कोंडले

पीक विम्याचा प्रश्न पेटला असून यावर बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज अधिकाऱ्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *