प्रत्येकजण नोकरीच्या शोधात असतो. बेरोजगार तसेच इतरत्र नोकरी करणारे लोकही चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. आजकाल नोकरीच्या नावाखाली बरीच फसवणूक होत आहे. जर तुम्हाला कोणत्याही वेबसाईटवर चांगल्या नोकरीची जाहिरात दिसली, ज्यामध्ये काम कमी आणि पगार जास्त असेल तर सावधान राहा. ही नोकरी नसून फसवणुकीचा सापळा आहे. ओटीपी मागून पैसे चोरण्याच्या पद्धती आता कालबाह्य झाल्या आहेत. ठगांनी फसवणुकीचे अनेक नवीन मार्ग शोधले आहेत.
नोकरी मिळवून देण्याची बतावणी करून वरूड तालुक्यातील एका युवतीकडून ९० हजार रुपये ऑनलाइन लुबाडल्यावर पुन्हा तिच्याकडे अनोळखी व्यक्तीने ३३ हजारांची मागणी करून तिची फसवणूक केली.
वरुड ठाण्याच्या हद्दीत एका गावात राहणारी युवती राज्यातील एका दुसऱ्या जिल्ह्यातील कंपनीमध्ये नोकरी करीत आहे. महिनाभरापूर्वीच सदर युवती ही सुटी काढून गावात आली. जरुड येथे असताना सहा मार्च २०२५ रोजी युवतीच्या मोबाईलवर फोन आला. संपर्क करणाऱ्याने स्वतःचे नाव अभिषेक असे सांगितले. एका कंपनीतून बोलत असून कंपनी जॉब कन्स्लटंसीमध्ये काम करीत असल्याचे सांगितले. वरुड तालुक्यातील युवतीने स्वतःचे शैक्षणिक दस्तऐवज अनोळखी व्यक्तीने दिलेल्या ई-मेलवर पाठविले.
प्रारंभी रजिस्ट्रेशन फी म्हणून १ हजार ५०० रुपये संशयित अभिषेक याने दिलेल्या क्रमांकावर पाठविले. त्यानंतर संबंधित युवतीला विविध प्रकारच्या लिंक पाठविण्यात आल्या. युवतीला विविध कारणे सांगून पैशाची मागणी केली. युवतीने ९० हजार ६२४ रुपये इतकी रक्कम भरल्यानंतरही पुन्हा तिला फोन करून ३३ हजार रुपयांची मागणी केली. युवतीने नोकरीबाबत विचारले असता संशयिताने उत्तर देण्यास टाळले. अभिषेक नामक संशयित व्यक्तीने आपली ९० हजार रुपयांनी ऑनलाइन फसवूणक केली, असा आरोप पीडित मुलीने वरुड ठाण्यात केला. प्रकरणी पोलिसांनी संशयित अभिषेकविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
फसवणुकीचे प्रकार वाढले
फसवणूक करणाऱ्या टोळ्या विश्वासार्हता निर्माण करतात त्यामुळे लोक लाखो रुपये गुंतवून बळी पडतात. सुशिक्षित पदवीधरही अशा घोटाळ्यांना बळी पडतात. पण अशा फसवणुकीत गमावलेले पैसे परत मिळू शकतात, पण सायबर गुन्ह्यांमध्ये लोकांनी गमावलेले पैसे परत मिळवणे हे एक कठीण काम आहे. फसवणूक करणारे अज्ञात लोकांचा वापर करून त्यांच्या नावावर बँक खाती उघडतात आणि त्यांच्या माहितीशिवाय खाती चालू ठेवतात. विशेषतः उत्तरेकडील राज्यांमध्ये या कामासाठी काही टोळ्या आहेत.