इराणविरुद्ध इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे गॅस टंचाईचा ताण वाढत असतानाच भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी अग्रीम रक्कम मिळाल्याशिवाय पेट्रोलपंपांना इंधनपुरवठा न करण्याची भूमिका घेतल्यामुळे अनेक पेट्रोलपंप मालकांना पेट्रोल मिळू शकले नाही, परिणामी असलेला साठा संपल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये पेट्रोलपंप कोरडे पडले आहे. वाहनधारकांना रांगेत उभे राहावे लागत असून परिस्थिती चिंताजनक झाली आहे. दुसरीकडे शासकीय सुट्ट्यांमुळे बँका बंद असल्याने पंपचालकांना निधीची जुळवाजुळव करणे कठीण जात आहे.
आखाती देशांतील संघर्षामुळे इंधन तुटवड्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरवर मर्यादा घालत घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही नागपूरसह विदर्भातील काही भागांत घरगुती सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच पेट्रोलियम कंपन्यांनी अग्रीम रक्कम घेऊनच पंप मालकांना पेट्रोल देण्याची भूमिका घेतल्याने त्याचा फटका पेट्रोल पंप चालकांना बसला आहे.
यापूर्वी इंधन खरेदीचे पैसे अदा करण्यासाठी पंप चालकांना दोन ते तीन दिवसांची मुदत दिली जात होती. मात्र, नव्या नियमांनुसार अग्रीम रक्कम जमा केल्याशिवाय पेट्रोल-डिझेलचा पुरवठा केला जात नाही. शिवाय साध्या पेट्रोलसोबत ठरावीक प्रमाणात ‘पॉवर’ पेट्रोल घेण्याची सक्ती केल्याच्या तक्रारीही आहेत. या अटींमुळे पंप चालकांचा आर्थिक ताण वाढला आहे.
अग्रीम रकमेची व्यवस्था करण्यासाठी बँका सुरू असणे आवश्यक असते. मात्र, हल्ली १९ आणि २१ मार्चच्या शासकीय सुट्ट्यांसह रविवारी (२२ मार्च) बँका बंद असल्याने अनेकांना वेळेत रक्कम जमा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे नागपुरातील सुमारे ८ ते १० पेट्रोलपंप कोरडे पडले, तर विदर्भातील इतर भागांतही अशीच परिस्थिती दिसून आली. यातच इंधन टंचाईच्या अफवा समाजमाध्यमांवर पसरल्याने नागरिकांनी सुरू असलेल्या पेट्रोलपंपांकडे धाव घेतली. त्यामुळे अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या. नागरिकांनी टंचाईच्या भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल घेणे सुरू केल्याने पेट्रोल पंप कोरडे पडले.
इंधन साठा वाढवून मिळणार नाही
आखातातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती वाढल्या असल्या तरी भारतात दरवाढ झालेली नाही. त्यामुळे कमी दरात विक्री करताना पेट्रोलियम कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मागील वर्षाच्या तुलनेत अधिक इंधन पुरवठा करणे शक्य नसल्याची तोंडी सूचना कंपन्यांनी पंप चालकांना दिल्याची माहिती आहे. याबाबत पंप चालकांच्या संघटनांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी अचानक देयक निकष बदलत अग्रीम रक्कम घेतल्याशिवाय पेट्रोल देणे बंद केले आहे. त्यातच शासकीय सुट्ट्यांमुळे बँकेतून पंप चालकांना पैशाची जुळवाजुळव करता येत नसल्याने काही पेट्रोल पंप कोरडे पडले होते. परंतु, आता या पंप चालकांनीही अग्रीम रक्कम भरल्याने तेथेही पेट्रोल लवकर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीकडून मागील वर्षीच्या तुलनेत जास्त पेट्रोल-डिझेल मिळणार नसल्याचे सांगणे योग्य नाही. ग्राहकांच्या मागणीनुसार पंप चालकांना ते मिळायला हवे. – अमित गुप्ता, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशन.
विश्वभारत News Website