वर्धा :- जिल्ह्यतील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. नागपूर ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग वर्ध्यापासून खूपच खड्डेमय झाला आहे. हा राष्ट्रीय महामार्ग वर्धा,अमरावती,वाशिम,मालेगाव ह्या जिल्ह्यातून जात असून ह्या मार्गावरून प्रचंड मोठया प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत आहे.त्यामुळे केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा.श्री नितिन गडकरी यांनी हा रस्ता मंजूर केला आहे.ह्या रस्त्याचे लवकरच चौपदरीकरणाचे काम सुरू होईल असे विधान वर्ध्याचे खा.श्री रामदास तडस यांनी सांगितले होते. वर्धा जिल्ह्यात सर्व लोकप्रतिनिधी हे भाजपचे आहेत.
खासदार,आमदार भाजपचेच असूनही रस्त्याची खस्ता हालत झाली आहे.मा.श्री नितीनजी गडकरी यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे.अशी मागणी वर्धा जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख,माजी खा.अनंत गुढे यांनी केली आहे. तसेच जिल्हा अंतर्गत वर्धा – हिंगणघाट, वर्धा-आर्वी,आर्वी-तळेगाव (शा.) सिमेंट रस्ते व वर्धा शहरातील रेल्वे उड्डाणपूलाचे काम अत्यंत धिमे गतीने सुरू असल्याने अपघात व वाहतुकीच्या अडचणीत वाढ झालेली आहे. देवळी – हिंगणघाट, पुलगाव ते आर्वी रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाली असून पुलगाव शहरातील रेल्वेच्या उड्डाण पुलाचे काम मागील तीन वर्षांपासून रखडलेले आहे.पण याकडे सर्व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असून या रस्त्यांची कामे केव्हा सुरू होतील हे जनतेला सांगावे.अशी विनंती अनंत गुढे यांनी केली आहे.