चंद्रपूर : एकाच छताखाली कॅन्सर स्क्रिंनिंग व निदान करण्याची सोय चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याने चंद्रपूरच्या आरोग्य विकासात भर पडली असल्याचे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ‘स्वस्थ चंद्रपूर कि ऑस्क’ उपक्रमाच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ भास्कर सोनारकर, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक डॉ. श्वेता सावलीकर, टाटा ट्रस्टचे जिल्हा समन्वयक सुरज साळुंके,आशिष सुपासे, अदिती निमसरकार, दिव्या पर्शिवे, मनीषा दुपारे उपस्थित होते.
टाटा ट्रस्ट च्या माध्यमातून असंसर्गिक रोगांच्या तपासणीसाठी रुग्णालयामध्ये कॅन्सर प्रिव्हेन्शन व वेळेत रुग्णांचे उपचार यासाठी नव्याने ‘स्वस्थ चंद्रपूर किऑस्क’ हा उपक्रम जिल्हा सामान्य रुग्णालय येथे राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून दररोज उच्च रक्तदाब, मधुमेह, गर्भाशयाचे कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर व मुखाचा कॅन्सर याची नियमित प्रतिबंध तपासणी केली जाणार आहे. यासोबतच तंबाखू व्यसनाचे समुपदेशन तज्ञाच्या मार्गदर्शन द्वारे करण्यात येणार आहे. टाटा ट्रस्टच्या चमू मार्फत एएनएम व जिएनएम यांना प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.