Breaking News

दारूबंदी समिक्षा समितीचे अहवाल शासनास सादर होणार….

चंद्रपूर-
चंद्रपूर जिल्ह्यात एप्रिल 2015 पासून अस्तित्वात असलेल्या दारूबंदीचा समाजमनावरील परिणाम जाणून घेण्यासाठी राज्य शासनाकडून गठित उच्चस्तरीय अभ्यास समितीचे कामकाज आता आटोपले असून, ही समिती पुढील दोन दिवसात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात लागू असलेल्या दारूबंदीचा या जिल्ह्यातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम झाला तसेच दारुबंदीबाबत येथील नागरिकांचे काय मत आहे, हे जाणून घेऊन त्याचा अभ्यासाअंती निष्कर्ष काढण्यासाठी राज्य शासनाने 12 जानेवारी 2021 ला सेवानिवृत्त प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यीय समिती स्थापन केली होती, ज्यात उत्पादन शुल्क विभागाचे नागपूर विभागीय उपायुक्त मोहन वर्दे, अ‍ॅड. प्रकाश सपाटे, अ‍ॅड. वामन लोहे, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, प्रदीप मिश्रा, चंद्रपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय तायडे, अ‍ॅड. जयंत साळवे, सामाजिक कार्यकर्त्या बेबी उईके यांच्यासह जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा समाजकल्याण अधिकारी तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचा समावेश होता.
या समितीला प्रारंभी आपला अहवाल सादर करण्यासाठी शासनातर्फे एक महिन्याची मुदत देण्यात आली होती, त्यास पुढे शासनाने 7 मार्च पर्यंतची मुदतवाढ दिली गेली. दरम्यान, समितीने 15 जानेवारी ते 5 मार्चपर्यंत एकूण 11 बैठका घेऊन दारूबंदीचा जिल्ह्यातील अर्थकारणावर, समाजकारणावर, गुन्हेगारी व सामाजिक आरोग्यावर काय परिणाम झाला याचा दारूबंदीनंतरचा तुलनात्मक स्वरूपात वस्तुनिष्ठ अभ्यास केला. सोबतच दारूबंदीसंदर्भात यापूर्वी न्यायालयाने निर्णय देताना काय मत नोंदविले होते, याचेही अध्ययन करण्यात आले.
समितीने दारुबंदीच्या संदर्भात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह नोंदणीकृत सामाजिक संस्थांचे काय मत आहे, हेदेखील जाणून घेतले. समितीकडे अनेक लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांनी आपले मत प्रदर्शित केले आहे. समितीचा अहवाल आता पूर्ण झाला असून, त्यावर समिती सदस्यांनी सोमवारी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. हा अहवाल आता पुढील दोन दिवसात राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. या अहवालावर लवकरच मंत्रिमंडळात चर्चा होणार असून, त्यावर राज्य सरकार अलिकडच्या काळात काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *