चंद्रपूर जिल्हा परिषदेचा 37 कोटी 72 लाखाचा अर्थसंकल्प सादर
चंद्रपूर-
ग्रामीण विकासाचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प शुक्रवार, 26 मार्च नियोजन भवनात पार पडलेल्या आमसभेत अर्थ व बांधकाम सभापती राजू गायकवाड यांनी सादर केला. हा अर्थसंकल्प 34 कोटी 72 लाख 48 हजार 800 रूपयाचा आहे. खर्च वजा जाता 10 लाख 60 हजार रूपयाची शिल्लक राहणार असल्याचे अर्थसंकल्पात नमूद आहे.सार्वजनिक मालमत्तचे परिक्षणासाठी 7 कोटीची तरतूद करण्यात आली. शिक्षणासाठी 17 कोटी, सार्वजनिक आरोग्यासाठी केवळ 1 कोटी 91 लाखाची तरतूद करण्यात आली. कोरोनाच्या सावटात आरोग्य विभागावर अगदी रक्कमेची तरतूद करण्यात आल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सभागृहात गोंधळही घातला. ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी 1 कोटी 35 लाख, समाजकल्याण विभागासाठी 25 कोटी 12 लाखाची तरतूद करण्यात आली. यासह महिला व बालकल्याण, सामाजिक सुरक्षा व कल्याण, कृषी, पशुसंवर्धन, पंचायत कार्यक्रम, लघु सिंचन विभागावरही भरघोस तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, बांधकाम सभापती राजू गायवाकड यांनी दिली.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी घट झाली आहे. मागील वर्षभरापासून शासनाकडून जमिन महसूल, सापेक्ष अनुदान व मुद्रांक शुल्क मिळाले नाही. त्यामुळे अर्थसंकल्पात घट झाल्याची माहिती लेखाधिकार्यासह जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिली.
ग्रामीण विकास साधू – संध्या गुरनुले
ग्रामीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पाणी यासह अन्य मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पण, ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी निधीची गरज आहे. माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष निधी उपलब्ध करून दिला होता. तसा निधी विद्यमान पालकमंत्र्यांनी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संध्या गुरनुले यांनी केली आहे.
