Breaking News
Oplus_131072

प्रफुल्ल गुडधे देणार फडणवीसांना जोरदार टक्कर

दक्षिण-पश्चिम नागपूर या आपल्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांची लढत काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्याशी आहे. फडणवीस यांच्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दक्षिण-पश्चिम हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. मतदारसंघाच्या निर्मितीपासूनच फडणवीस येथून निवडणूक लढवत असून तेच सातत्याने विजयी होत आले आहे. २०१९ मध्ये ते मुख्यमंत्री म्हणून या मतदारसंघात निवडणूक लढले होते. आता ते उपमुख्यमंत्री म्हणून रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधातील प्रफुल्ल गुडधे यांच्यासोबत त्यांची ही दुसरी लढत आहे. यापूर्वी २०१४ मध्ये फडणवीस विरुद्ध गुडधे अशी लढत झाली होती. व त्यात फडणवीस विजयी झाले होते. यंदा काँग्रेसने पुन्हा गुडधेंवर विश्वास दाखवला आहे.

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्र हा ओबीसीबहुल म्हणून ओळखला जातो. या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने प्रचाराची रणनीती आखली आहे. प्रफुल्ल गुडधे पाटील हे ओबीसी प्रवर्गातून येतात. दुसरीकडे, भाजपनेही ओबीसीवरील आपली पकड कायम ठेवण्यासाठी या समाजासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. फडणवीस यांच्या मतांची आघाडी कशाप्रकारे वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघात ओबीसीनंतर दलित मते निर्णायक ठरतात. सुमारे २२ टक्के दलित मतदार आहेत. यांनाही स्वत:कडे वळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजप असे दोन्ही पक्ष प्रयत्नरत आहे. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांना ५५ हजार मतांची आघाडी मिळाली होती तर २०२४ मध्ये ती २२ हजाराने कमी होत ३३ हजार झाली होती. त्यामुळे भाजपने या मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

२०१४ साली फडणवीस यांनी ५८ हजार मतांची गुडधे पाटील यांचा पराभव केला होता, मात्र यंदा काँग्रेससह महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी (शरद पवार) हे दोन पक्ष काँग्रेससोबत आहेत.

पूर्व विदर्भात लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुन पराभव झाला असला तरी विधानसभा निवडणुकीत या भागात बहूतांश जागांवर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री, दोन प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि वरिष्ठ मंत्री रिंगणात असल्याने पूर्व विदर्भातील या पाच प्रमुख लढतींकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.नागपुरातील दक्षिण-पश्चिम मधुन देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टक्कर काँग्रेसचे प्रफुल गुडधे देणार आहेत, असा अंदाज आहे.

यापूर्वीच्या निवडणुकांपेक्षा यंदाची महाराष्ट्रातील निवडणूक वेगळी आहे. राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा दोन प्रमुख पक्षांमध्ये फुट पडल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सहा पक्षांमध्ये महाराष्ट्रात थेट लढती होणार आहेत. त्यात पूर्व विदर्भात होणारी लढत ही सर्वांसाठी लक्षवेधी ठरणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दक्षिण-पश्चिम नागपूर मतदासंघातून चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर कामठी विधानसभेतून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, साकोली विधानसभेतून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ब्रह्मपुरी विधानसभेतून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बल्लारपूर विधानसभेतून वनमंत्री व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार निवडणूक रिंगणात आहेत. या प्रमुख लढतींकडे महाराष्ट्रांचे लक्ष लागले आहे.

विदर्भातील एकूण ६२ विधानसभा मतदारसंघात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १२ मतदारसंघ आहेत. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात ८, बुलढाणा जिल्ह्यात ७, यवतमाळ जिल्ह्यात ७, चंद्रपूर जिल्ह्यात ६, अकोला जिल्ह्यात ५, वर्धा जिल्ह्यात ४, गोंदिया जिल्ह्यात ४, भंडारा जिल्ह्यात ३, वाशिम जिल्ह्यात ३ आणि गडचिरोली जिल्ह्यात ३ विधानसभा मतदारसंघ आहेत.

 

फडणवीस सहाव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात

राज्याचे लक्ष दक्षिण-प्रश्चिम नागपूरच्या निवडणुकीकडे लागले आहे. मागील पाच निवडणुकीत निवडून आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहाव्यांदा या मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. १९९९ ते २००४ पर्यंत दोनदा पश्चिम नागपूर आणि मतदारसंघाच्या पुर्नरचनेनंतर २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये तीनदा अशी पाचदा निवडणूक लढवली आहे. १९९९ मध्ये फडणवीस यांनी काँग्रेसचे अशोक धवड, २००४ मध्ये रणजीत देशमुख, २००९ मध्ये विकास ठाकरे, २०१४ मध्ये प्रफुल्ल गुडधे आणि २०१९ मध्ये आशीष देशमुख यांना पराभूत केले होते. यावर्षी पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांच्यासोबत थेट लढत होणार आहे.

 

नाना पटोलेंसमोर भाजपसह अपक्षांचे आव्हान

२०१९ ला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्ष पद देण्यात आले. त्यानंतर या पदाचा राजीनामा देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. २०१९ मध्ये पटोले यांनी भाजपचे परिणय फुके यांचा सहा हजारांवर मतांनी पराभूत केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा साकोली मतदारसंघातून नाना पटोले निवडणुकीला समोर जात आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांचे आव्हान आहे. २०१९ ला कमी मताधिक्य असल्याने पटोलेंसमोर मोठे आव्हान आहे. तसेच भाजपने विविध समाजाचे अपक्ष उमेदवारही दिले आहेत.

 

चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा रिंगणात

कामठी विधानसभा मतदारसंघातून २००४ ते २०१४ पर्यंत तीनदा सलग निवडून येणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुन्हा एकदा या मतदसंघातून रिंगणात उतरले आहेत. दलित आणि मुस्लीम बहूल असणाऱ्या या मतदारसंघातून कायम निवडून येणाऱ्या बावनकुळेंना भाजपने २०१९ मध्ये उमेदवारी नाकारली होती. यावेळी भाजपचे टेकचंद सावरकर यांनी काँग्रेसच्या सुरेश भोयर यांचा पराभव केला होता. बावनकुळे यांच्याकडे आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद असून ते स्वत: कामठी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांची थेट लढत ही काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्यासोबत होणार आहे.

 

वडेट्टीवारांची भाजपसोबत थेट लढत

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे पुन्हा एकदा ब्रह्मपुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. २००४ मध्ये पहिल्यांदा त्यांनी शिवसेनेकडून चिमूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पुन्हा एकदा चिमूर मतदारसंघातून निवडणूक लढवली व जिंकली. मात्र, २०१४ पासून त्यांनी आपला मतदारसंघ बदलवत ब्रह्मपुरीमधून दोनदा निवडणूक लढवली आहे. यावेळी भाजपचे कृष्णलाल सहारे यांच्यासोबत त्यांची थेट लढत होणार आहे.

 

बल्लारपूरमधून मुनगंटीवार पुन्हा रिंगणात

भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार पुन्हा एकदा बल्लारपूर मतदारसंघातून निवडणुकीला समोर जाणार आहेत. त्यांनी १९९९, २००४ असे दोनदा चंद्रपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. मतदारसंघाच्या पुर्नरचनेनंतर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने मुनगंटीवार यांनी २००९ ते २०१९ पासून बल्लापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला. यावर्षी त्यांची थेट लढत ही काँग्रेसचे संतोष सिंह रावत यांच्यासोबत होणार आहे.

About विश्व भारत

Check Also

रामटेकमध्ये आशिष जैस्वाल यांची दमछाक : राजेंद्र मूळक मारणार बाजी?

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार …

उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यावरून वातावरण तापले

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे सोमवारी शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे जाहीर सभेसाठी आले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *