उत्तर कोल्हापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. काँग्रेसचे राजेश लाटकर यांच्या बंडखोरीला कंटाळून मधुरिमा राजे छत्रपती यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच राजेश लाटकर यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. दरम्यान, मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. “मला कशाला तोंडघशी पाडलं? दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं ना”, असं म्हणत असताना सतेज पाटील हे संतापल्याचे पाहायला मिळाले. “निवडणूक लढायची नव्हती तर मग आधीच निर्णय घ्यायचा होता. कारण ही माझी पूर्णपणे फसवणूक करण्यासारखं आहे. आम्हाला काही अडचण नव्हती. पण आधीच नाही म्हणून सांगायला हवं होतं. हे चुकीचं आहे, मला तोंडघशी पाडायची काय गरज होती? हे बरोबर नाही, मला मान्य नाही. अजिबात बरोबर नाही. तुम्ही जेवढ्यांनी आग लावली ना.. तेवढ्या सगळ्यांना सांगतो. मला कशाला तोंडघशी पाडलं? दम नव्हता तर उभं राहायचंच नव्हतं ना मग मी पण दाखवली असती माझी ताकद”, असं म्हणत संताप व्यक्त करत सतेज पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
सतेज पाटील काय म्हणाले?
“मला आज दोन वाजून ३६ मिनीटांनी मालोजीराजे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की, उमेदवारी अर्ज माघार घेणार आहोत. मी त्यांना म्हटलं की असा निर्णय घेऊ नका. कारण एक उमेदवारी बदलून दुसरी उमेदवारी काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या नेत्यावर विश्वास ठेऊन दिली होती. मी त्यांना म्हटलं की, कितीही संकटे असू द्या. पण असा निर्णय घेऊ नका. शेवटी जेव्हा निवडणूक लागते तेव्हा आपण निवडणुकीत ताकदीने उतरतो. मी त्यांना म्हटलं की काहीही काळजी करू नका. काही झालं तर ती जबाबदारी बंटी पाटील म्हणजे माझी असेल आणि असं सांगितलं आणि फोन बंद केला. त्यानंतर मी लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलो. त्यानंतर काय घडलं? याच व्हिडीओ सर्वांनी पाहिला असेल. कारण ती परिस्थिती माझ्या हातात नव्हती. काय घडतंय हे मला समजलं नव्हतं. आता त्यांचा हात उमेदवारी थांबवणं मला देखील संयुक्तिक वाटतं नव्हतं. तेव्हा माझ्याकडून एखादं वाक्य जाऊ नये, त्यामुळे मला लोकांनी गाडीत बसवलं आणि जायला सांगितलं. आता सर्व हे घडल्यानंतर माझ्याकडे उत्तर नव्हतं”, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.