महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत. अत्यंत प्रचंड आणि घवघवीत यश महायुतीला मिळालं आहे. मागच्या तीन दशकात एकाही युती किंवा आघाडीला असं यश मिळवता आलं नव्हतं. २३ नोव्हेंबरच्या या निकालावर विरोधकांनी काही प्रमाणात संशय व्यक्त केला आहे. मात्र आता महायुतीसमोरचा पुढचा पेच आहे मुख्यमंत्री कोण?
शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विसर्जित झालं आहे. राजभवनावर पोहचत एकनाथ शिंदे यांनी राज्यपालाकांडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे १४ वी विधानसभा विसर्जित झाली आहे.
मुख्यमंत्री कोण होणार यावरुन भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत पेच
महायुतीत भाजपाला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला सलग तिसऱ्यांदा १०० पार जागांचं यश मिळालं आहे. त्यांच्या नावे हा रेकॉर्डच तयार झाला आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ५७ आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवारांच्या ४ अशा ६१ जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री या पदावर दावा सांगितलेला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर आमची काही हरकत नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीने म्हटलं आहे. तर संघानेही देवेंद्र फडणवीस यांच्या नावालाच अनुमोदन दर्शवलं आहे. दुसरीकडे शिवसेनेची मागणी वेगळी आहे. आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
उदय सामंत काय म्हणाले?
संजय राठोड यांनी जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे आम्ही जेवायला संजय राठोड यांच्या निवासस्थानी जेवायला आलो होतो. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही सगळे काम करतो. मंत्री कोण असेल? पुढची रणनिती काय असेल हे एकनाथ शिंदे ठरवतील असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याच्या शंका एकनाथ शिंदेंनी पोस्ट करुन दूर केल्या आहेत. मंत्रिमंडळ बरखास्त झालं आहे कारण एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. ती एक राजकीय प्रक्रिया आहे त्यात वेगळं काही नाही. तसंच ज्यांनी विरोधी पक्षनेता कोण असेल हे ज्यांना ठरवता येत नाही त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री कोण हे प्रश्न विचारु नये असाही टोला उदय सामंत ( Uday Samant ) यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले उदय सामंत?
पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त झालं आहे. चौदावी विधानसभा बरखास्त झाली आहे. एकनाथ शिंदे हे आता काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. आमच्या महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसतील आणि योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतील. शिवसैनिकांच्या मनात आपलाच नेता मोठा व्हावा हे असणार आहे. तसंच भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मनातही असणार यात चुकीचं काही नाही. आमचे तिन्ही नेते निर्णय घेतील. लवकरात लवकर निर्णय होईल. महायुतीत जो मुख्यमंत्री होईल त्याला बाकीचे सगळे जण पाठिंबा देतील असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे.शिंदे यांनी भाजपच्या ऑफर नाकारल्यास त्यांचा करेक्ट कार्यक्रम होऊ शकतो, अशी चर्चा आहे.