तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी आराखडा सादर करावा -पालकमंत्री सुनिल केदार
वर्धा, (जिमाका):-कोरोनाची तीसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. या लाटेचा जास्त परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी आतापासुन बालकाच्या सुरक्षेबाबत काळजी घेण्यासाठी नियोजन करावे. तसेच तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने कोणत्या साधनांची आवश्यकता भासणार आहे याचा अभ्यास करून तसा आराखडा तात्काळ प्रस्तावित करावा, जेणेकरून वेळेच्या आत त्यासाठीची तयारी पूर्ण करता येईल, असे निर्देश पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.
सेवाग्राम रुग्णालयाने भविष्यातील कोरोना परिस्थिती पाहता ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्ट सुरु करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. राज्य शासनाच्या वतीने यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे श्री केदार यांनी यावेळी सांगितले.
आणीबाणीच्या काळात रुग्णांना आक्सिजन आवश्यकता भासल्यास सेवाग्राम व सावंगी येथील रुग्णालयांनी जम्बो ऑक्सिजन सिंलेंडर राखीव स्वरुपात ठेवावे. सेवाग्राम, सावंगी व सामान्य रुग्णालयास लिक्वीड ऑक्सिजनचे टँकर प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात येईल असेही ते म्हणाले .
जिल्हाधिकारी कार्यालयात आज कोविड आढावा संदर्भात बैठक घेण्यात आली यावेळी आमदार रणजित कांबळे,जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. सोळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगने, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे प्रशासकिय अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांची उपस्थिती होती.
ग्रामीण भागात वाढत असलेला कोरोना प्रसार थांबिविण्यासाठी ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील यांची समिती गठीत करुन कोरोना बाधित असलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करावे. त्यांना गृहविलगीरणात राहण्यास सांगावे, तसेच वेळेवेळी रुग्णाचे ऑक्सिजन व तापमान तपासावे. गृहविलगीकरणातील व्यक्तीची ऑक्सीजनचे प्रमाण कमी झाल्यास समितीने त्या व्यक्तीस रुग्णालयात दाखल करण्यात यावे. तसेच लॉकडाऊनच्या काळात बरेच नागरिक बाहेर फिरतांना आढळत असून अशा नागरिकांवर पोलिसांनी सक्त कारवाई करण्याच्या सूचना श्री केदार यांनी केल्यात.