कोरोनाचा वाढता प्रकोप व मृत्यूची संख्या
गडचांदूर व कोरपणा येथे ऑक्सिजन बेड तात्काळ वाढवावे – शेतकरी संघटना
चंद्रपूर, 7 मे –
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व गडचांदूर या भागात कोरोना महामारीमुळे ऑक्सिजन बेड अत्यंत कमी पडत असून या दोन्ही ठिकाणी असलेल्या ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन बेड वाढविण्याची मागणी कोरपना तालुका शेतकरी संघटनेने केली आहे.
कोरपना तालुक्यात व औद्योगिक क्षेत्र असलेल्या गडचांदूर परिसरात कोरोना या महामारीचा प्रकोप फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे बव्हंशी रुग्णांना अपुरे असलेली बेडची संख्या भरल्यानंतर औषधोपचारासाठी तेलंगणा राज्यातील आदिलाबाद, मंचेरिअल येथे जावे लागते व तेथील ट्रीटमेंट महागडी असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ती परवडत नाही. कोरपना व गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यकक्षेत व शेजारच्या गावांमध्ये मृत्यूसंख्याही सतत वाढत आहे.
म्हणून कोरपना तालुक्यात कोरोना महामारीच्या प्रकोपावर नियंत्रण आणण्यासाठी व सर्वसामान्यांना परवडणारी शासकीय वैद्यकिय सेवा मिळण्यासाठी कोरपना ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये वीस ऑक्सिजन बेड आणि गडचांदूर ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटरमध्ये पंधरा ऑक्सीजन बेड तातडीने वाढविण्याची मागणी कोरपना तालुका शेतकरी संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व जिल्हाधिकारी,चंद्रपूर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात कोरपना तालुक्यातील भयावह स्थितीची माहिती व अतिरिक्त ऑक्सिजन बेडची मागणी पत्राद्वारे माजी आमदार अँड. वामनराव चटप, प्रभाकर दिवे,अरुण नवले,अँड.श्रीनिवास मुसळे, नीळकंठ कोरांगे,प्रा.ज्योत्स्ना मोहितकर,पोर्णिमा निरांजने,बंडू राजूरकर,अविनाश मुसळे,संध्या सोयाम,रमाकांत मालेकर,विलास धांडे,प्रवीण सावकार गुंडावार,संतोष पटकोटवार,मुमताज अली,प्रवीण एकरे,पं.स.सदस्य सविता काळे,नगरसेवक सुभाष तुराणकर,संजय येरमे,रवी गोखरे,मदन सातपुते,आशिष मुसळे,पद्माकर मोहितकर,अनंता गोडे,सत्यवान आत्राम,मारोतराव काकडे,देवाजी पाटील हूलके,प्रभाकर लोडे यांनी केली आहे.