विश्व भारत ऑनलाईन :
गिट्टीची वाहतूक करताना जप्त टिप्पर आणि ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी तसेच पुन्हा नियमित वाहतूक करु द्यावी यासाठी एका वाहतूकदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील तलाठी नरेंद्र रामचंद्र ठाकरे(४४) यास रंगेहाथ पकडून अटक केली.
तक्रारकर्ता ट्रॅक्टर आणि टिप्परद्वारे गिट्टीची वाहतूक करतो. १० ऑक्टोबरला वाहतुकीदरम्यान त्रुटी आढळल्याने तलाठी नरेंद्र ठाकरे याने टिप्पर पकडून नंतर तो सोडून दिला. परंतु टिप्पर सोडण्याचा मोबदला म्हणून १० हजार आणि बेतकाठी साजाच्या हद्दीतील खाणीतून नियमित गिट्टी वाहतूक करु देण्यासाठी दरमहा १० हजार अशी २० हजार रुपयांची लाच तलाठी ठाकरे याने तक्रारकर्त्यास मागितली. तडजोडीअंती तो १५ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाला. परंतु त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार आज संध्याकाळी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तलाठी ठाकरे यास अटक केली.