✍️मोहन कारेमोरे
कोट्यवधींची खनिज संपत्ती असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. खनिजांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे रस्त्यांची चाळण झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी लालपरीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा गाठणं शक्य होत नाही. तर खड्ड्यांसोबतच धुळीचं साम्राज्य पसरल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय.
👉स्थगिती उठवा!
8-10 महिन्यापूर्वी रस्ते नूतनीकरण काम जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात करण्यात आले. मात्र, काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे पितळ आता दिसून येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे सरकारच्या काळातील कामावरील स्थगिती उठवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. यासाठी पाठपुरावा करण्याकडेही त्यांनी कानाडोळा केला आहे.
👉ट्रक ठरतात कर्दनकाळ
गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. खनिजाची वाहतूक करणारे ट्रक या रस्त्यांची चाळण होण्यामागचं कारण ठरलं आहे. धूळ उडवत वेगाने धावणाऱ्या ट्रकमुळे रस्ता खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळानेही बसचं नुकसान नको म्हणून अहेरी गावाला जाणाऱ्या बसच बंद केल्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांची शाळा देखील सुटली. हीच अवस्था चौडमपल्ली, लगाम, चुट्टुगोंटा, बोरी, दामपूर, शांतिग्राम, शिवणीपाठ, मुक्तापूर, राजपूर, सुभाषनगर, खमनचेरू, फुलसिंगनगर, नागेपल्ली अशा अनेक गावातील विद्यार्थ्यांची आहे. उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी कसे तरी शाळेत जात आहे. मात्र, प्राथमिक शाळेतील विद्यार्थी तर शिक्षणालाच मुकले आहे. सर्वात विपरीत परिणाम विद्यार्थिनींच्या शिक्षणावर झाला आहे. अनेकांची परीक्षा बुडाली आहे, तर अनेकांना आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्या आहेत.
👉आरोग्य समस्या
गडचिरोलीतील अहेरी, भामरागड, कोरची, कुरखेडा,चार्मोशी, मुलचेरा आणि आलापल्ली या अतिदुर्गम प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय आरोग्याच्या सोयी नाहीत. त्यामुळे गंभीर रुग्णांना सडक मार्गाने चंद्रपूर गडचिरोली किंवा नागपूरला नेण्याशिवाय पर्याय नाही. अनेकांसाठी हा मार्ग मृत्यूचा मार्ग ठरला आहे. कारण खराब रस्त्यांमुळे वेळेत रुग्णालयात न पोहचू शकल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सुरजागड खाणीतून रोज हजारोंच्या संख्येने निघणाऱ्या ट्रक्समुळे शैक्षणिक, आरोग्य विषयक समस्यांसोबतच शेतीचंही नुकसान होतं आहे. कष्टाने पिकवलेलं पांढरं सोनं धुळीमुळे काळ पडू लागलंय.
👉राष्ट्रीय महामार्ग दुर्लक्षित
आष्टी ते अहेरी दरम्यानचा अत्यंत वाईट अवस्था झालेला हा मार्ग तसा राष्ट्रीय महामार्ग आहे. मात्र, या पट्ट्यातील वनक्षेत्र आणि चपराळा अभयारण्यामुळे वन विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील वादात रस्ता अडकला आहे. आता कोट्यवधी रुपयांचा अर्थकारण लाभलेला लोह खनिज या रस्त्यावरून नेलं जात असल्यामुळे रस्त्याचे काम सुरू केल्यास लोह खनिजाची वाहतूक थांबवावी लागेल. त्यामुळे रस्ता बांधला जात नाही आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.