गडचिरोलीतील धानोरा उपविभागातील कटेझरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील चारवाही जंगल परिसरात मोठा घातपात घडवून आणण्यासाठी नक्षल्यांनी जमिनीत पुरलेले स्फोटके शोधण्यात पोलिसांना यश आले.
यात मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य देखील हस्तगत करण्यात आले.फेब्रुवारी ते मे या कालावधीत नक्षलवादी ‘टीसीओसी’ (टॅक्टीकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) च्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात घडवून आणतात. याच उद्देशाने त्यांनी कटेझरी-चारवाही जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात स्फोटके पुरून ठेवली होती. मंगळवारी दुपारच्या सुमारास माहितीच्या आधारावर गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाने अभियानदरम्यान स्फोटके निकामी करीत नक्षल साहित्य जप्त केले. यात २ जिवंत ग्रेनेड,२ ग्रेनेड फायर कफ, १८ वायर बंडल, ५ ब्लास्टींग स्टिल डब्बे, १ प्लास्टिक डबा (टुल किटसह), ४ वायर कटर, ७ ग्रेनेड माऊंटींग प्लेट, १ लहान लोखंडी आरी, २० नक्षल पुस्तके, ७ टु-पीन सॉकेट आदी साहित्य हस्तगत करण्यात आले. सोबत बीडीडीएस पथकाने जप्त स्फोटके निकामी केले.