नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका सुपारी व्यापाऱ्याचे अपहरण करून अमानुष छळ करण्यात आल्याची घटना पाच महिन्यांनंतर उजेडात आली आहे. नानक सुहाराणी असे या पीडित व्यापाऱ्याचे नाव आहे. आरोपींनी त्याला बंदी बनवून त्याच्या सर्वांगावर सिगारेटचे चटके दिले.
मिळालेल्या माहिती नुसार पीडित नानक नानक सुहाराणी याने काही व्यापाऱ्यांना पैसे उधार दिले होते. तसेच काही हवाला आणि सुपारी व्यापाऱ्यांकडून पैसे उधारही घेतले होते. २० मे २०२३ रोजी नानक सुपारीचे पैसे आणण्यासाठी नागपुरहून गुजरातला निघाले. त्या नंतर पाच महिने उलटूनही ते घरी परतले नाही. नानक बेपत्ता झाल्याची तक्रार घरच्यांनी लकडगंज पोलिस ठाण्यात दिली होती. या घटनेला पाच महिने होऊन गेले. अपहरणकर्त्यांनी नानक यांना नंदुरबार येथे लपवून ठेवले होते. पीडित नानक अपहरणकर्त्याच्या तावडीतून कसाबसा सुटला. त्याने थेट नंदुरबार उपनगर पोलिस ठाणे गाठून पोलिसांनी आपबीती सांगितली.
नंदुरबार उपनगर पोलिसांनी नानकच्या घरच्यांना याची माहिती दिली. नानकच्या पत्नीने नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात जाऊन त्याला नागपुरला घेऊन आली. नागपूर येथे लकडगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेमागे हात असल्याच्या पाच संशयीतांची नावे पोलिसांना दिली आहे. लकडगंज पोलिस आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.