शरद पवार हे १७ ऑगस्ट रोजी विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. पवार यांचा दौरा राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण करणारा ठरत असतो. या दौऱ्यात मात्र त्यांचे अधिकृत राजकीय कार्यक्रम नाहीत. तरीही काही वेळ राखीव असल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
खासदार शरद पवार हे १७ ऑगस्ट रोजी शनिवारला खासगी विमानाने मुंबईतून निघणार असून सकाळी साडेदहा वाजता नागपुरात पोहचतील. नागपुरात वनामतीचा सकाळी कार्यक्रम आहे. धरमपेठ येथील वसंतराव नाईक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. तो झाल्यानंतर नागपुरातील हॉटेल रेडिसन ब्लू येथे दुपारी अडीच पर्यंत राखीव वेळ आहे. दुपारी चार वाजता ते वर्ध्यात दाखल होणार आहेत. सहकार नेते व माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी कृतज्ञता वर्षाचा सांगता सोहळा यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात असून पवार मुख्य पाहुणे आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व शेकाप नेते जयंत पाटील प्रामुख्याने उपस्थित असतील.
पवार यांचा दौरा निश्चित होता. मात्र हा दौरा शासकीय की खासगी विमानाने करायचा असा घोळ सुरू असल्याची चर्चा १५ ऑगस्टला दुपारपर्यंत सुरू होती. आयोजकांनी त्यास दुजोरा दिला होता. आता शरद पवार हे खासगी विमानाने येण्याचे निश्चित झाले आहे. हा घोळ का, या प्रश्नावर बोलताना एका नेत्याने स्पष्ट केले की, खासगी विमानाचा प्रवास हा वेळेच्या दृष्टीने सोयीचा ठरतो. विमान प्रवासाचे काही सोपस्कार टाळतात. विमानाचे वेळेचे बंधन असत नाही. तसेच आपल्यामुळे विमानातील इतर प्रवाशांना होणारा त्रास टाळतो. सोयीने येणे व सोयीने जाणे खासगी विमानानेच शक्य होत असल्याने शरद पवार यांनी खासगी विमान प्रवास निवडल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात शरद पवार यांचे स्वीय सचिव सतीश राऊत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. फोन आणि एसएमएसला त्यांचे उत्तर मिळाले नाही.
मात्र शरद पवार व नितीन गडकरी यांचा वर्धेत होणारा संयुक्त दौरा जोरदार चर्चेत आहे. दोघांच्याही भाषणांवर प्रतिक्रिया हमखास उमटतात. बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नितीन गडकरी यांच्या भाषणाची तर वर्धेकरांना प्रतीक्षा आहे.