काही दिवसांपासून एकनाथ खडसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांमुळे भाजपातील प्रवेशाची घोषणा केली गेली नाही, असे खडसे म्हणाले होते.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल इतका राग का? याबद्दल त्यांनी आज मौन सोडले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
खडसे म्हणाले, “माझा राग तर काय आहे की, गिरीश तर पिल्लू आहे. गाडीखाली असते ना, त्या काय म्हणतो आपण? तशातला आहे. माझा राग खरे म्हटले तर मी नाव घेऊ इच्छित नव्हतो पण घेतो. माझा राग आहे, देवेंद्रजींवर!”
“मी कधी कुणावर टीका केली नाही”
“मी कुणावरही राग व्यक्त केला नाही. मी कधी भाजपला म्हटले नाही. आजपर्यंत कुणा नेत्यावर नाही, कुणा मंत्र्यावर नाही. कधी मोदींवर नाही, कधी शाहांवर नाही. मी कधीही टीका टिप्पणी केली नाही”, असेही खडसे यावेळी म्हणाले.
“या लोकांवर असे आहे की, काहीतरी विचित्र सारखं करणं. उत्तर महाराष्ट्रात नेतृत्व माझं होतं. उत्तर महाराष्ट्रात मी प्रत्येक वेळी आठ-दहा आमदार निवडून आणलेले आहेत. सहा-सहा खासदार होते. आज नाहीये. आज आमचे दोन जळगावचे आहे, तेवढे मी आणले म्हणून. नाक राहीले”, असा टोला खडसे यांनी गिरीश महाजन यांना अप्रत्यक्षपणे लगावला.
खडसेंचे गिरीश महाजनांना चिमटे
“अशी परिस्थिती असताना निव्वळ महाराष्ट्रात नाथाभाऊचे नेतृत्व खच्चीकरण करणं, महाराष्ट्रात नाथाभाऊंना कमजोर दाखवण्यासाठी गिरीशला वर आणण्यात आलं. हे तर उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. नाहीतर गिरीशभाऊ कर्तृत्ववान माणूस आहे. अनेक प्रकल्प त्याने महाराष्ट्रात उभे केले. अनेक ठिकाणी त्यांचं व्यक्तिमत्व उघडकीस आलं”, असे म्हणत खडसेंनी गिरीश महाजन यांना चिमटे काढले.
देवेंद्रजींनी गिरीश महाजनांचं ऐकावं, इतकं तर…
पुढे बोलताना खडसे म्हणाले, “त्यामुळे देवेंद्रजींचा अत्यंत आवडता व्यक्ती म्हणून त्यांचा उल्लेख होतो. खालच्या राजकारणात गिरीशने सांगावं आणि देवेंद्रजींनी ऐकावं इतकं तर होता कामा नये. त्याला वर आणायचं तर त्याला वर आणा. पण, मला बदनाम करण्याचं काय कारण? तुम्ही बघाल, तर आयुष्यभरात एक आक्षेप माझ्यावर नाहीये. एक भ्रष्टाचाराचा आरोप नाही. मी हजारो मुलांना नोकऱ्या लावल्या. एकाने तरी सांगावं की नाथाभाऊंनी पैसे घेतले”, असे उत्तर खडसे यांनी दिले.