महायुतीची सत्ता आली.भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत.देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता नागपूरच्या पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे भाजप कार्यकर्त्यासह सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात महायुतीची सत्ता असताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी होती. फडणवीस मुख्यमंत्री झाले. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. नागपूरमधून कोणाला संधी मिळेल व पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्याचा पालकमंत्री कोण, असा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्याना पडला असून त्याची राजकीय वतुर्ळात चर्चा सुरू झाली आहे. २०१४ ते २०१९ या काळात युतीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्या काळात चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री होते. आता बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. नागपूर जिल्ह्यात भाजपचे आठ आमदार निवडून आले असून त्यात पूर्व नागपुरातून कृष्णा खोपडे हे चौथ्यांदा तर समीर मेघे हिंगणा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहे. दक्षिण नागपुरातून मोहन मते तिसऱ्यांदा निवडून आले आहे. याशिवाय मध्य नागपुरातून प्रवीण दटके, सावनेरमधून आशिष देशमुख, काटोलमधून चरणसिंग ठाकूर आमदार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे, त्यांना मंत्रीपद मिळाले तर ते पुन्हा पालकमंत्री होऊ शकतात. यांच्याऐवजी प्रवीण दटके किंवा कृष्णा खोपडे यांच्या नावाचा विचार झाल्यास यांच्यापैकी पालकमंत्री होईल. पण त्यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे लागणार आहे.
प्रवीण दटके यांनी विधानपरिषदेत जिल्ह्याच्या विकासासंबंधी अनेक विषयावर आवाज उठवला होता. त्यांना महापालिकासंबंधी विविध विषयाचा अभ्यास आहे. कृष्णा खोपडे वरिष्ठ नेते असून ते चौथ्यांदा आमदार असले तरी शहर व जिल्ह्याच्या विकासासंबंधी त्यांचा तेवढा अभ्यास नाही. प्रवीण दटके यांच्यासोबत समीर मेघे यांचे नाव चर्चेत आहे. लवकरच नागपूर महापालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्यामुळे त्यात पालकमंत्र्याची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.