Breaking News

बेकायदा बांधकामांवरुन सहाय्यक आयुक्त निलंबित

Advertisements

कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या मांडा-टिटवाळा अ प्रभाग हद्दीतील बेकायदा बांधकामे रोखण्यात अयशस्वी ठरल्याचा ठपका ठेवत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी अ प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना पालिका सेवेतून सोमवारी निलंबित केले. मागील पंधरा दिवसापासून रोकडे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन होता. अ प्रभाग हद्दीतील मांडा, टिटवाळा, बल्याणी, बनेली, उंभार्णी, वासुंद्री परिसरात बेसुमार बेकायदा चाळी सुरू होत्या.

Advertisements

 

टिटवाळ्यातील बाह्य वळण रस्त्याची पाहणीसाठी आयुक्त डाॅ. जाखड टिटवाळ्यात आल्या होत्या. त्यावेळी परिसरातील बेकायदा चाळी पाहून आयुक्तांनी तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आणि या कारवाईत हलगर्जीपणा केलातर कठोर कारवाईची तंबी दिली होती.

Advertisements

 

आयुक्तांनी आदेश देऊनही रोकडे यांनी जुजुबी कारवाई करण्याव्यतिरिक्त टिटवाळा परिसरातील एकाही बेकायदा बांधकामांवर आक्रमक कारवाई केली नाही. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही असे मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या माध्यमातून पालिकेला आदेश दिले आहेत. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांनी वारंवार आदेश देऊनही, नोटिसीव्दारे सूचित करूनही आपण अ प्रभाग हद्दीतील बेकायदा बांधकामे रोखली नाहीत. आपल्या कर्तव्यात आपण कसूर केली, असा ठपका ठेवत प्रशासनाने साहाय्यक आयुक्त रोकडे यांना सेवेतून निलंबित केले.

 

डाॅ. रोकडे अ प्रभागातील बेकायदा बांधकामे नियंत्रणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने उद्विग्न झालेल्या आयुक्त डाॅ. जाखड यांनी गेल्या महिन्यात रोकडे यांची अ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करून तेथे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांची नियुक्ती केली होती. पदभार स्वीकारल्यापासून साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी गेल्या २५ दिवसांच्या कालावधीत टिटवाळा परिसरातील सुमारे ८०० हून अधिक चाळी, गाळे, इमारतींची बांधकामे जमीनदोस्त केली. पाटील यांनी अल्पावधीत बेकायदा बांधकामे भुईसापट केली आणि यापुढेही त्यांची बेकायदा बांधकामांविरुध्दची मोहीम जोरदार सुरू आहे. हे काम रोकडे यांनी का केले नाही, असे प्रश्न आता प्रशासनात उपस्थित केले जात आहेत.

 

रोकडे यांनी मागील काही वर्षात ज्या प्रभागांमध्ये साहाय्यक आयुक्त म्हणून काम केले तेथील बेकायदा बांधकामांना नोटिसा देण्याव्यतिरिक्त त्यांनी कधीही ती बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई केली नाही, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. रोकडे हे शासन मान्यताप्राप्त पालिकेतील साहाय्यक आयुक्त आहेत. ते उपायुक्त पदाचे दावेदार मानले जात.

 

अ प्रभागातील अनधिकृत बांधकामे निष्कासनाची कारवाई करण्यात कसूर केल्याने आणि वरिष्ठांचे आदेशाचे उल्लंघन आणि कार्यालयीन शिस्तीचा भंग केल्याने महापालिका अधिनियमातील कलम ५६ (१) (ब) कलमाने संदीप रोकडे यांना पालिका सेवेतून निलंबित केले आहे. – हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जंगली जानवरों के आतंक से सिवनी जिले किसान बेहद परेशान

जंगली जानवरों के आतंक से सिवनी जिले किसान बेहद परेशान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: संयुक्त संपादक …

महाराष्ट्रात नवीन जमीन घोटाळा : वाचा

मल्टी-कोटी ‘लँड जिहाद’ उघड वकिलांनी बळकावलेल्या मालमत्ता परत मिळवून प्रशासनातील त्रुटी उघड केल्या मुंबई: भुसावळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *