वर्धा : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- संततधार पाऊस, रोगराई, पुर, धरणाचे बॅक वॉटर व कोविड चा प्रादुर्भाव या नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर, संत्रा, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी त्यांना
शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी ‘एमआयटी – महाराष्ट्र सरपंच संसदे’च्या वर्धा जिल्हा शाखेच्यावतीने वर्धा जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्ह्याधिकारी व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
‘एमआयटी – महाराष्ट्र सरपंच संसदे’चे वर्धा जिल्हा समन्वयक,सामाजिक कार्यकर्ते व आर्वी तालुक्यातील सर्कसपूरचे उपसरपंच निखिल कडू यांनी ही माहिती दिली.
निवेदन सादर करतांना निखिल कडू यांच्यासमवेत वर्धा जिल्ह्यातील ‘महाराष्ट्र सरपंच संसद – ग्राम’ चे सरपंच अर्चना नारनवरे(झुणका,ता.समुद्रपूर),
अमोल बुरीले (लाडकी,ता.हिंगणघाट),
सुरेखा नागोसे
(जोलवाडी,ता.आष्टी),
सौ. प्रिया बोबडे ( बाभूळगाव,ता.देवळी),
श्री.धनराज टूले (नेरी पुनर्वसन,ता.वर्धा), रमेश लोहकरे(नागझरी,ता.कारंजा घाडगे) व रोशन दुधकोहळे
(नानबर्डी (डोंगरगाव),ता.सेलू) हे उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक जोपासण्यासाठी अत्यावश्यक असणारी कामे करणे कठीण झाले आहे.
सोयाबीन पिकावर खोडअळी व बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील संपूर्ण सोयाबीन पिक शेतकऱ्यांच्या हातुन गेले आहे.
संततधार पाऊसामुळे कापूस पिकात फुल व पाती गळ आणि बोंड सड झाली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादनातून देखील यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळणे शक्य नाही.
सुरवातीला चांगले दिसणारे तुरीचे पिक संततधार पाऊसामुळे पिवळे पडले किंवा काही ठिकाणी अती पाऊसामुळे जागीच जुळलेले आहे.
संत्रा व मोसंबी पिकांमध्ये संततधार पाऊसामुळे बुरशीजन्य आजार तयार होऊन मृग बहारातील संपूर्ण फळांची गळती झाली आहे, त्यामुळे मृग बहाराचे पिक संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातुन गेलेले आहेत.
वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी नदी व नाल्यांना पुर आल्याने भाजीपालावर्गीय पिकांचे देखील प्रचंड नुकसान झाल्याने वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
वर्धा जिल्ह्यातील ‘निम्म वर्धा प्रकल्पा’त साठवण केलेल्या पाणीसाठ्यातील बॅक वॉटर मुळे संपादित केलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांच्या शेतजमीन देखील जलमय झाल्याने शेतकरी खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकापासून होणाऱ्या आर्थिक लाभापासून वंचित झालेले आहेत.
उपरोक्त विविध नैसर्गिक आपत्ती व कोरोना (कोविड – १९) च्या प्रादुर्भावामुळे वर्धा जिल्ह्यातील विविध पिके उत्पादित करणारा शेतकरी आर्थिक अभूतपूर्व संकटात सापडला आहे.
शासनाने या परिस्थितीचा सहानुभूती पुर्वक विचार करून शासनामार्फत या संकटकाळात शेतकऱ्यांना ठोस आर्थिक मदत करावी असे या निवेदनात म्हटले आहे.
‘एमआयटी – महाराष्ट्र सरपंच संसदे’च्या वतीने सादर करण्यात आलेले हे विशेष निवेदन वर्धा जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.सरिता ताई गाखारे,जिल्हाधिकारी यांच्यावतीने निवासी जिल्ह्याधिकारी सुनील कोरडे तर जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावतीने जिल्हा कृषी विकास अधिकारी अभय कुमार चव्हाण यांनी स्वीकारले.