- चंद्रपूर येथे खनिज विकास निधीतुन कोविड-१९ रुग्णांच्या
- ४८ तासांच्या आत निर्णय न घेतल्यास भाजपाचा आंदोलनाचा इशारा
चंद्रपूर : चंद्रपूर येथे खनिज विकास निधीतुन कोविड-१९ रुग्णांच्या निःशुल्क उपचारासाठी १ हजार बेडचे जंबो हॉस्पीटल उभारावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी तर्फे जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांची भेट घेत आज निवेदन सादर केले.
या मागणी संदर्भात जिल्हाधिका-यांशी चर्चा करताना देवराव भोंगळे म्हणाले, चंद्रपूर जिल्हा हा देशातील सर्वाधीक प्रदुषीत जिल्हा म्हणुन ओळखला जातो. वे.को.लि.च्या कोल माईन्स, अनेक उद्योगांच्या माध्यमातुन या जिल्हयात मोठया प्रमाणावर प्रदुषण केले जाते. त्यामुळे या जिल्हयातील नागरिकांना अनेक गंभीर आजारांना सातत्याने सामोरे जावे लागते. यासाठी खनिज विकास निधी या जिल्हयाला दिला जातो. सद्यःस्थितीत चंद्रपूर जिल्हयात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वाढती रुग्णसंख्या तसेच रुग्णांचे होणारे मृत्यु लक्षात घेता कोविड-१९ च्या रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हयात खनिज विकास निधीतुन १ हजार बेडचे जंबो हॉस्पीटल उभारण्याची आवश्यकता आहे. या हॉस्पीटलच्या माध्यमातुन नागरिकांना निःशुल्क उपचार देण्याची आवश्यकता आहे. १ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हयात १०२८२ अक्टिव रुग्ण असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर १ नोव्हेंबर रोजी २५ हजार रुग्ण अॅक्टीव असण्याची शक्यता आहे. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आधीच जय्यत तयारी करणे आवश्यक आहे.
वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शासकीय रुग्णांलयांमध्ये रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाहीत. योग्य उपचार सुध्दा होत नाही. योग्य उपचाराअभावी रुग्णांचे मृत्यु होत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष उफाळला आहे. अशा परिस्थितीत खनिज विकास निधीच्या माध्यमातुन १ हजार बेडचे जंबो हॉस्पीटल उभारणे गरजेचे आहे. आजच्या घडीला आरोग्या इतका महत्वाचा विषय दुसरा कोणताही नाही. त्यामुळे आरोग्यासाठी खनिज विकास निधी वापरुन त्यामाध्यमातुन हे हॉस्पीटल शासकीय पातळीवर निर्माण होणे गरजेचे आहे. या ठिकाणी डॉक्टर्स व नर्सेस यांना चार पट पगार देण्याची आवश्यकता आहे. त्यामाध्यमातुन खाजगी डॉक्टर्स या ठिकाणी सेवा देण्यास तयार होतील. प्रामुख्याने आयसीयु बेड्स, ऑक्सीजन, पीपीई किट, आवश्यक इंजेक्शन्स, उत्तम भोजनाची व्यवस्था, चाचण्यांची जलद व्यवस्था, मेडीकल वेस्ट डिस्पोजल ची व्यवस्था आदी सोयी उपलब्ध करत अत्याधुनिक हॉस्पीटल तातडीने खनिज विकास निधी अंतर्गत निर्माण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे. याबाबत ४८ तासांच्या आत आपण निर्णय घेतला नाही. तर भाजपा तर्फे आम्ही तिव्र आंदोलन करु असा इशारा यावेळी देण्यात आला. शिष्टमंडळात जिल्हा परिषदेचे अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, भाजपाचे महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, भाजयुमो महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.