चंद्रपूर दि.30 ऑक्टोबर:
केंद्र सरकारच्या हंगाम 2020-21 किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात 25 धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंजुरी दिलेली आहे. जिल्ह्यात तालुका निहाय खरेदी केंद्र उपलब्ध करून दिले असल्याने शेतकऱ्यांना आपला धान जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करून विकणे सोयीचे झाले आहे.
हि लागतील कागदपत्रे:
शेतकऱ्यांनी केंद्रावर नोंदणी करण्याकरिता चालू वर्षाचा सातबारा, आधार कार्डची झेरॉक्स व चालू खाते असलेल्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, जनधन खाते असलेले बँक खाते नसावे इत्यादी कागदपत्रे सादर करावी.
हि आहेत तालुकानिहाय खरेदी केंद्र:
मुल तालुक्यातील मुल व राजोली, सिंदेवाही तालुक्यातील सिंदेवाही, नवरगाव व रत्नापूर, सावली तालुक्यातील सावली व्याहाळ खुर्द, व्याहाळ व पाथरी, नागभीड तालुक्यातील नागभीड, तळोधी व कोर्धा, चिमूर तालुक्यातील चिमूर व नेरी, ब्रह्मपुरी तालुक्यातील ब्रह्मपुरी, बरडकिनी, अव्हेर-नवरगाव, पिंपळगाव, चौगान व आवळगाव, पोंभुर्णा तालुक्यातील बोर्डा, दीक्षित तर बल्लारपूर तालुक्यातील कोठारी याठिकाणी खरेदी केंद्र नेमून दिले आहे.तर चंद्रपूर तालुका हा मूल खरेदी केंद्रांना जोडण्यात आलेला आहे.
असा आहे धान खरेदी केंद्रावर धान खरेदी कालावधी:
खरीप खरेदी कालावधी दि. 1 ऑक्टोबर 2020 ते दि. 31 मार्च 2021 पर्यंत तर रब्बी खरेदी कालावधी दि. 1 मे 2020 ते दि.30 जून 2021 पर्यंत राहील.
असा आहे धान प्रकारानुसार धानाचा दर:
धान अ-प्रत धानाचा दर एक हजार 888 रुपये प्रति क्विंटल तर साधारण धान दर एक हजार 868 रुपये प्रति क्विंटल असा राहील.शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर धान नेताना धान साफ असावा व त्याचा ओलावा (आद्रता) 17 टक्के च्या आत असावी.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्रावर दिलेल्या तारखेस शेतकऱ्यांनी आपला धान आणावा. खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. केंद्रावर शेतकऱ्यांना आवश्यक गरजा पुरविणे बाबत केंद्रप्रमुखांना व संबंधित तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीना सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे जिल्हा पणन अधिकारी अनिल गोगीरवार यांनी कळविले आहे.