Advertisements
शेतकऱ्यांनो, बोगस कापूस बियाणे खरेदी करू नका- वाल्मीक प्रकाश – जयंत धात्रक

आलेख रट्टे -वरोरा :- तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांद्वारे खरीप हंगामामध्ये कापूस पिकाला प्रथम पसंती दिली जाते. पुढील खरीप हंगामाच्या नियोजनासाठी शेतकरी तयारीला लागला आहे. अशावेळेस संधीचा लाभ घेण्यासाठी बोगस कंपन्या अनाधिकृत एजंट/ व्यक्तीद्वारे बोगस बियाणांचा पुरवठा करतात. त्यामुळे बिजी -३, आर.आर.बी.टी. , एच.टी.बी.टी. या नावाने अनोळखी व्यक्तींकडून शेतकऱ्यांना कापूस बियाण्याची विक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा अनाधिकृत विक्रेत्यांकडून सावध राहावे, शासनाने अनिधिकृत केलेले एचटीबीटी बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी वाल्मीक प्रकाश व पंचायत समितीचे कृषी अधिकारी जयंत धात्रक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलेआहे.
तणनाशक बी टी, आरआरबीटी, चोर बीटी, बीजी – ३ ही अनिधिकृत बीटी बियाणे आहेत. सदर बियाणे हे जमिन , पर्यावरण व आरोग्यास अत्यंत घातक असून त्याच्या अति वापरामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होऊन भविष्यात कोणतेही पीक घेतांना अडचण येते. जमीन नापीक होते. बेकायदेशीर रित्या विक्री होणाऱ्या बियाण्यांच्या पॉकीटावर कोणत्याही प्रकारचे वाण, तंत्रज्ञान किंवा शिफारस यांची माहिती नसते. या बियाण्यावर तणनाशकाची फवारणी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे कॅन्सर व मुत्रपिंडाचे आजार होतात. पर्यायाने शेतीचे व पर्यावरणाचे नुकसान होउन मानवी आरोग्यास हानी पोहचते . अनाधिकृत बोगस बियाण्याचे पक्के देयक देण्यास येत नसल्यामुळे फसवणुक झाल्यास कोणतीही भरपाई मिळत नाही . शेतकऱ्यांनी बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करतांना गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत कंपनी उत्पादक, अधिकृत बियाणे विक्री परवानाधारका कडून परवानगी असलेले कापूस बीटी बियाणे खरेदी करावी, कोणत्याही खाजगी व्यक्तीकडून बियाणे , खते, किटकनाशके खरेदी करू नये व अशा अमिषाला बळी पडू नये. निविष्ठा खरेदी करतांना पॉकीटे, पिशव्या, बाटल्या मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकीटावरील अंतीम मुदत पाहुनच खरेदी करावी . पक्के बिल घेण्यास टाळाटाळ करू नये. किटकनाशके अंतीम मुदतीचे आतील असल्याची खात्री करावी. कृषी निविष्ठाबाबत तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार निवारण कक्ष पंचायत समिती, कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार नोंदवावी, असे आवाहन कृषी अधिकारी व्ही.आर. प्रकाश व जे.एस. धात्रक यांनी केले आहे.
Advertisements