मूल-
मोहफुले वेचण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना बुधवार, 31 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास तालुक्यातील आगडी येथे घडली. कल्पना नामदेव वाढई (54, रा. आगडी) असे मृतक महिलेचे नाव आहे. सध्या जंगली भागात सर्वत्र मोहफुलांचा हंगाम सुरू आहे. ग्रामीण परिसरात मजुरी मिळत नसल्यामुळे येथील नागरिक मोहफुल वेचून त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. अशातच कल्पना वाढई ही महिला आई कौशल्या मांदाळे हिच्यासह सकाळी गावालगत असलेल्या जंगल परिसरात मोहफुल वेचायला गेली होती. मोहफुल उशिरापर्यंत पडत असल्याने कौशल्या ही जेवण करण्यासाठी घरी निघून आली.
दरम्यान, वाघाने कल्पनावर अचानक हल्ला चढवून तिला ठार केले. कल्पना बराच वेळ होऊनही घरी परतली नाही. त्यामुळे तिचा मुलगा उमेश वाढई याने जंगलात जाऊन तिचा शोध घेतला. मात्र, ती आढळली नाही. त्यामुळे गावकर्यांना सोबत घेऊन पुन्हा शोध घेतला असता कक्ष क्रमांक 115 मध्ये कल्पना मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती गावकर्यांनी वनविभागाला दिली. माहिती कळताच वनपाल प्रशांत खनके, वनरक्षक राकेश गुरनुले, पंचायत समिती सदस्य वर्षा लोनबले, दामोधर लेनगुरे व गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाने घटनेचा पंचनामा करून अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. पीडिताच्या कुटुंबियांना तात्काळ सानुग्रह मदत करावी व वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार,आगडी जंगलपरिसरातील घटना
Advertisements
Advertisements
Advertisements