(प्रा जोगेंद्र कवाडे सरांच्या १ एप्रिल ७८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष लेख.)
भिमप्रतिज्ञा घेणारे प्रा.जोगेंद्र कवाडे.
महाराष्ट्र राज्यात आंबेडकरी चळवळीत एकशेएक धुरंधर राष्ट्रीय नेते आहेत.ते रिपब्लिकन ऐक्यासाठी नेहमीच तयार असतात.समोर गर्दी दिसली की ते प्रत्येक वेळी काही तरी लक्षवेधी घोषणा करीत असतात. नेत्यांचे व समाजांचे ऐक्य राहण्यासाठी जीव देण्यासाठी तयार असतात, आणि ऐक्यातून कोणी फुटून बाहेर पडला तर त्याला उद्याचा सूर्य दिसू देणार नाही अशी लाखोंच्या जनसागरा समोर शिवाजी पार्क दादर मुंबई येथे भिमप्रतिज्ञा घेणारे लॉग मार्च प्रणेते प्रा जोगेंद्र कवाडे यांचा ७८ वा जन्म दिन १ एप्रिल “संघर्ष नायक दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तसा तो दरवर्षी साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आत्मचिंतन करणारा लेख लिहत आहे.
मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नांव देण्यासाठी सरांनी जीवाचे रान केले.ऐतिहासिक लॉग मार्च काढला.तेव्हा मी आमचे संपूर्ण कुटुंब त्यांचे भक्त होतो.नामांतर कृती समिती ते दलित मुक्ती सेना, व्हाया दलित मुस्लिम सुरक्षा महासंघ पर्यत मी भक्त होतो. प्रा जोगेंद्र कवाडे सरा सारखा निर्भीड,निःपक्षपाती, प्रामाणिक लढाऊ झुंजार नेता महाराष्ट्र राज्यात नव्हे तर भारतात असूच शकत नाही, एवढा आत्मविश्वास आम्हाला वाटत होता. महाराष्ट्रात ३३ जिल्हे असतांना सरांना सतरा जिल्हे बंदी असणे म्हणजे गिनीज बुकात नोंद असणारा एकमेव नेता असावा असा माझा तेव्हा समज होता. तेव्हा आपले भाषण आम्ही कान देऊन मन शांत ठेऊन ऐकत होतो.तुमचे भाषण ऐकले की अंगावरचे केस ताठ उभे राहायचे.म्हाताऱ्यांच्या अंगातील रक्त तरुणांप्रमाणे सळसळत असे.ते भाषण ऐकून मुठी आवळून घोषणांनी आकाश पातळ दणाणून सोडत असो.तेव्हा पासुन आम्ही सरांची धडा शिकविण्याची भाषा ऐकतो.आज पर्यत आपल्या प्रत्येक सभेत मोर्चात,आपण जातीवाद्यांना सत्ताधाऱ्यांना,मायबाप सरकारला धडाच शिकवत आहात. रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यातून बाहेर पडल्यास उद्याचा सूर्य दिसू देणार नाही, शिवाजी पार्क मधील एका सरसेनापती च्या भिमप्रतिज्ञेचे काय झाले?.असे आजची मुलंमुली विचारतात.
नामांतराच्या लढाईत अनेकांना धडे शिकविण्याच्या भाषेनेच खेड्यापाड्यातील गोरगरीब असंघटित मजुरांचा आई बहिणीची इज्जत लुटायला लावली. अनेक गावांतील महारवाडे, बौद्धवाडे, माणसांसह जाळून टाकण्यास भाग पाडले.कारण प्राध्यापकांची भाषाचं कायम सत्यानाश करणारी होती. जातीवाद्यांच्या ढुंगणावर भीमटोळे मारणारे, सत्ताधाऱ्यांचे धोतर पिवळे करणारे प्रा जोगेंद्र कवाडे कुठेच दिसले नाही.एकीकडे ही जहाल भाषा असतांनाच दुसरीकडे नामांतरासाठी ह्या प्राध्यापक कवाडे मेला तरी चालेल, त्याचे तुकडे तुकडे केले तरी चालतील,पण नामांतर झाल्याशिवाय राहणार नाही. असे बेंबीच्या देठापासून सांगणारे प्रा.कवाडे सरांनी लाखो भीमसैनिकांना भक्त बनविले होते.पण भिमाच्या क्रांतिकारी विचारांचे शंभर सैनिक बनवू शकले नाही. भक्तांचे सेनापती होता येते.शिष्यांना सैनिकांना शिस्त लावण्यासाठी सेनापतीला शिस्त लागते.सैनिकांना शिस्तबद्ध पालन देण्यासाठी बौद्धिक शक्ती लागते.शत्रूवर हल्ला करण्याचे प्रशिक्षण द्यावे लागते. प्राध्यापक कवाडे सर आपण ते भीमसैनिकांना काहीच देऊ शकला नाही.
नामांतरासाठी लढणाऱ्यांना शेवटी प्रथम दिलेल्या जोडनांवावर म्हणजेच नामविस्तारावरच समाधान मानावे लागले. मग एवढा रक्तपात घडविण्याची गरज काय होती?.नामांतराच्या चळवळीत मागासवर्गीय एस सी समाजाचे कोणते प्रबोधन आपण केले?. शांती, समता,बंधुभाव,निर्माण करण्या ऐवजी आपण कायम शिवीगाळ, सत्यानाश,धडा शिकवू,जाळून टाकू या शब्दांचे बॉम्बगोळे आपण भाषणांतून भोळ्याभाबड्या एस सी मागासवर्गीय समाजावर फेकत होता.त्यामुळेच तो असंघटित मजूर समाज पेटून उठायचा,त्यामुळेच गावा गावांतील वातावरण ढवळून काढले जात होते. गावा बाहेर राहणाऱ्या समाजाने गावात राहणाऱ्या समाजाला धडा शिकवला नाही तर गावांच्या आत राहणाऱ्या समाजाने गावा बाहेर राहणाऱ्या समाजाला धडा शिकवला, हा इतिहास आपल्या जहाल भाषणांनी घडविला असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही. सांगा कवाडे सर आपण कोणाकोणाला धडा शिकवला?.
महाराष्ट्र राज्यातील ३३ जिल्ह्या पैकी सतरा जिल्ह्यात प्रवेश बंदी यांचे आम्हाला खूप कौतुक व गर्व वाटायचे. परंतु भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांने संविधानाच्या पानांवर लिहून ठेवले होते, की ज्याच्या भाषणामुळे, वागण्यामुळे दोन समाजात शांतता भंग पावत असेल ज्या व्यक्तीमुळे दोन समाजात जातीय दंगल होण्याची शक्यता असेल अशा व्यक्तीला जिल्ह्यात सभा घेण्याची,भाषण करण्याची बंदी घातली जाते. कायद्यानुसार १४४ कलम लागु करून पोलीसांना त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागते.सांगा सर पोलीस कोणाच्या नियमांचे पालन करीत होते. कशासाठी आपल्याला प्रवेश बंदी होती. तेव्हा आम्हाला कळत नव्हते,भारतीय संविधान कधी वाचलेच नव्हते.इतिहास वाचला तर इतिहास घडविला जातो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे प्रत्येक आंदोलन सत्याग्रह शांततेत व कायदेशीर मार्गाने होत होती.एका बाजूला समाजाचे प्रबोधन दुसऱ्या बाजूला कायदेशीर सनदशीर मार्गाने पत्रव्यवहार करून संघटित पणे लढाई असायची.रस्त्यावरच्या लढाईत ते कमी पडले असतील तरी कायदेशीर लढाईत ते कुठेही कमी पडले नाही,कारण त्यांचा मूकनायक, प्रबुद्ध भारतातील लोकांचा सरसेनापती विधाविभूषित कायदेपंडित डॉ बाबासाहेब आंबेडकर होता.नामांतर चळवळीतुन तयार झालेले सरसेनापतीनी दलितांना मुक्त करण्यासाठी सेना निर्माण केली होती.परंतु खेड्या पाड्यातील असंघटित शेतमजूर,वीट भट्टी कामगार, खडी फोडणारा कामगार,शहरातील झोपडपट्टीत राहणार असंघटित कष्टकरी नाका कामगार,इमारत बांधकाम कामगार,घरकामगार,कचरा वेचक,सफाई कामगार यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तेव्हा ही कृतीकार्यकर्म, योजना नव्हत्या आणि आजही नाही.समाजांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटने कडे, नेत्याकडे अभ्यासपूर्ण योजना असाव्या लागतात. मागासवर्गीय समाजा साठी राज्य व केंद्रांच्या योजना फक्त कागदावर असतात. त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याकडे ठोस उपाययोजना कार्यक्रम नाही.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना देऊन ठेवल्या आहेत, त्यांचा अभ्यास करून त्यांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आपल्या उभी केली पाहिजे तरच आपण रिपब्लिकन पक्षाच्या विचार धारे नुसार सर्वांना समान न्याय मिळवून देऊ शकतो. रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यातून चार महान नेते खासदार झाले,त्यावेळी रिपाईने लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के विजय मिळवला होता.असा इतिहास लिहला गेला आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत चार नेते चार दिशेला गेले आणि इतिहास पुसून टाकला. सर आपण ही निर्भीड, निःपक्षपाती प्रामाणिक सरसेनापतीचा इतिहास पुसून टाकला आहे.
शरद पवार यांनी नामांतर ठराव मंजूर केला पण अंमलबजावणी केली नाही, त्यांच्या विरोधात सोळा वर्ष जनआंदोलने केली,त्यांनीच शेवटी तडजोड करून नामविस्तार केला.त्यांच्या आशीर्वादाने आपण खासदारांचे विधान परिषदेत आमदार झाला.राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना खाली तालुख्याचा नेता बनवून ठेवले.खासदार आमदार बनत नाही, मुख्यमंत्री होणार असेल तर चालते.कारण तो राज्याचे नेतृत्व करतो. विधान परिषदेत असलेला आमदार राष्ट्रीय नेता नसतो, त्याने ती संधी आपल्या पक्षातील दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेत्या दिली पाहिजे होती. त्यासाठी गोपाळराव, रमाकांत, बाबुराव,अशांतभाई, चिंतामण,या ही पेक्षा एकशे एक तानसेन होते ज्यांनी तुम्हाला सुरवात पासून शेवट पर्यंत जीवाला जीव लावून मदत केली.त्यांनाच आपण धडा शिकवला.सर काल पर्यत सर्वांना धडा शिकवला पण पाठांतर घेतले नाही. म्हणूनच आज भिमसैनिकांना त्यांची शिक्षा मिळत आहे. सर नामांतर चळवळीत ज्यांच्या घरदारांची राख रांगोळी झाली तो कोण होता?.तो तेव्हा ही असंघटित मजूर,कामगार होता आणि आज ही आहे.त्यांचा वापर आपण फक्त राजकारणासाठी केला आणि करीत आहात.त्यांच्या करीता अनेक कल्याणकारी योजना आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी उर्वरित आयुष्य लावा निरोगी राहा,सुखी राहा. १९८२ मी तुमचा भक्त होतो, विजय सातपुते यांच्यामुळे कामगार नेता पत्रकार झालो,म्हणूनच लाखो भीमसैनिकांच्या वतीने लिहत आहे.आज पर्यंत दिलेल्या प्रत्येक जाहीर सभेतील धड्याची अंमलबजावणी करा.सरसेनापती म्हणून सैन्याला शिस्त लावा. प्रा जोगेंद्र कवाडे सरांच्या ७८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाचकांना हार्दिक शुभेच्छा!!!.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडुप मुंबई, अध्यक्ष- सत्यशोधक कामगार संघटना, स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.