कोरोनाने जिल्ह्यात झालेल्या मृत्यूची चौकशी करा- नरेश पुगलिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चंद्रपूर-
चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीचा हक्काचा भरमसाठ पैसा असताना व जिल्हा नियोजन निधीतून 30 टक्के खर्चाचे अधिकार प्रशासनाला असतानासुध्दा डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचार्यांची नियुक्ती वाढीव पगाराने न करण्यामागील कारणे काय, कोरोनामुळे झालेल्या भरमसाठ मृत्यूला जबाबदार कोण याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधांचा अभाव आहे. तसेच पहिल्या व दुसर्या कोरोना लाटेत रुग्णांच्या मृत्यू संख्येमध्ये भयंकर वाढ झाली आहे. त्यामुळे जनतेत तीव्र संताप आहे. रुग्णासाठी लागणारा प्राणवायू, व्हेंटिलेटर, खाटांची कमतरता, औषधीचा तुटवडा, डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचार्यांची कमतरता आहे. शासनाच्या निर्देशानुसार कंत्राट पध्दतीने डॉक्टर व इतर चमूच्या नियुक्तीचे अधिकारी असतानासुध्दा कोरोनामध्ये काम करणार्या कर्मचार्यांना वाढीव वेतन देण्यास नकार दिल्यामुळे दोनदा मुलाखती घेवून सुध्दा नियुक्तीस विलंब होत आहे. त्यामुळे दररोज 20 ते 30 रुग्ण मृत्यूमुखी पडत आहे. त्यामुळे जनतेत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी हे जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांना विनंती करून एक दिवसाच्या पगारातून जमा झालेल्या राशीच्या माध्यमातून पाच एमडी डॉक्टराची नियुक्ती करू शकतात. तर असा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री का घेऊ शकत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. पोलिस विभागाला 15 नवीन वाहन देण्यास तत्पर राहणारे पालकमंत्री डॉक्टर व वैद्यकीय कर्मचार्यांना वाढीव पगार देण्यास का तयार रहात नाही, असाही प्रश्न त्यांनी केला आहे.
जिल्ह्यात पहिल्या लाटेत 200 च्यावर रुग्णांना आपले जीव गमवावे लागले. दुसर्या लाटेत 1 हजार 250 च्यावर मृत्यूचा आकडा गेला असून, आता तरी जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, उच्च न्यायालयात शपथपत्र देणार्या अधिकार्यांनी प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी व डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचार्यांना अधिकचा पगार देऊन त्यांच्याकडून सेवा करून घ्यावी. तसेच औषधाचा साठा व इतर साहित्याचा त्वरित पुरवठा करावा व रुग्णाचे प्राण वाचवावे. जिल्ह्यात म्यूकरमायकोसिस या आजाराचे 26 रुग्ण मिळाले असल्यामुळे या आजाराची तज्ज्ञ डॉक्टर तसेच औषधसुध्दा उपलब्ध करावे, अशी मागणी त्यांनी केली.
पंतप्रधान 20 मे रोजी देशातील अती कोरोनाग्रस्त जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांशी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार असून, त्यावर उपायोजन सूचविणार आहे. त्यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. याचे गांभीर्य समजून मुख्यमंत्र्यांनी स्वत: जातीने या परिस्थितीचा आढावा घेतल्यास येथील रुग्णाचे प्राण वाचविण्यात मदत मिळेल व जनतेला न्याय मिळेल, असे नरेश पुगलिया यांनी पत्रात नमूद केले आहे.

कोरोनाने जिल्ह्यात झालेल्या मृत्यूची चौकशी करा – नरेश पुगलिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Advertisements
Advertisements
Advertisements