चक्रीवादळ वळले, पण मुसळधार पावसाची शक्यता
पुणे,-
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले असले, तरी त्याचा फटका आता महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्ट्यांना बसणार नाही. हे चक्रीवादळ ओमानकडे सरकत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हे चक्रीवादळ मान्सूनसाठी मात्र पोषक असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
या चक्रीवादळाने आपली दिशा बदलली असून, ते ओमानच्या दिशेने पुढे सरकत आहे. महाराष्ट्रासह देशाच्या पश्चिम किनारपट्टीला त्याचा धोका नसला तरी, महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक या राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य वारे सक्रिय होणार आहे. मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण यामुळे निर्माण होणार असून, त्याची गती देखील वाढणार आहे. यावर्षी 1 जून रोजी मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने अलिकडेच वर्तविला आहे. देशात उत्तर-दक्षिण असा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. विदर्भापासून केरळच्या किनारपट्टीपर्यंत हा पट्टा सक्रिय झाला असल्याने, विदर्भात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आणखी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाची स्थिती कायम राहणार आहे.
