चंद्रपूर,
कोरोनानंतर उद्भवणार्या म्युकरमायकोसिस या आजाराचे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या 43 रुग्ण आढळून आले आहेत. हा आजार कोरोनाची लागण होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये आढळून येत आहे. शिवाय यामध्ये जबडा, डोळे, किडनी या अवयवांना गंभीर दुखापत होत आहे. या संदर्भात उपाययोजनांचा एक आराखडा तयार करण्याचे निर्देश माजी अर्थमंत्री व विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
रविवार, 16 मे रोजी म्युकरमायकोसिस या आजाराविषयी माहिती घेत आ. मुनगंटीवार यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. या आजाराबाबत जनजागृती, पथ्य आणि हा आजार होऊच नये यासाठी उपाययोजना करता येईल काय या विषयी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश टेकाडे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. सुशील मुंदडा, डॉ प्रवीण घोडे, डॉ. हर्ष मामीडवार, रा. स्व. संघाचे विभाग प्रचारक अश्विन जयपूरकर, मनपाचे उपाध्यक्ष राहुल पावडे, स्थायी समिती अध्यक्ष रवी आसवानी, प्रकाश धारणे आदी उपस्थित होते.
आ. मुनगंटीवार म्हणाले, म्युकरमायकोसिससाठी आपण आरोग्यमंत्र्यांशी बोलून आवश्यक लस निःशुल्क उपलब्ध होण्यासाठी विनंती केली असून, त्यांनीदेखील ही विनंती मान्य केली आहे. आजाराविषयी जिल्ह्यात आयएमएने पुढाकार घेऊन अद्ययावत सुविधांची आखणी करावी, त्यासाठी शासकीय रुग्णालयात एक स्वतंत्र कक्ष उभारावा, याचबरोबर अतिशय महत्वाचे म्हणजे जनजागृती करण्यात यावी, आजारविषयीचे पथ्य पाळण्यात यावे आणि आजार होऊच नये यासाठी काही प्रयत्न करता येतील का, ते तपासण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली.
यावेळी डॉ. राठोड यांनी, म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाचे लक्षणे सांगितली. हा आजार ‘म्युकोरेल्स’ फंगसमुळे होतो. चेहर्यावर सूज येते. तोंडातून दुर्गंधी येते. हिरड्यांवर फोड येतात. अचानक दात हलतो. सर्दी असणे, नाक बंद होणे, साईनसच्या जागेत दुखणे, नाकातून रक्त येणे, नाक दुखणे, डोळे दुखणे, डोळ्यांना कमी दिसणे, तीव्र डोके दुखणे, मेंदूच्या नसांचा त्रास होणे आदी लक्षणे त्यांनी सांगितली.
आवश्यक यंत्रसामुग्री, औषधे व इंजेक्शन्स यांची माहिती त्वरित उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुनगंटीवार यांनी अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले. त्या अनुषंगाने आपण शासनाकडे पाठपुरावा करू, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले. या बैठकीला शहरातील नेत्रचिकित्सक, दंतचिकित्सक, इएनटी तज्ज्ञांची उपस्थिती होती.
