ट्रस्टच्या जागेचे अकृषक प्रमाणपत्र (एनए) मंजुरीसाठी तलाठ्याने स्वतःसाठी व वरिष्ठ अधिकार्यांसाठी तब्बल 42 लाखांच्या लाचेची मागणी केली, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत शिरूरच्या तत्कालीन तहसीलदार रंजना उमरहांडे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणावर गुन्हे दाखल?
तत्कालीन तहसीलदार उमरहांडे यांच्यासह शिरूर महसूल सहायक कार्यालयातील तहसीलदार स्वाती सुभाष शिंदे, शिरूरचा तहसीलदार सरफराज तुराब देशमुख आणि खासगी व्यक्ती अतुल घाडगे, निंबाळकर नावाच्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 46 वर्षीय व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीनेच्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या ट्रस्टच्या जागेचे एनए प्रस्ताव मंजुरीसाठी शिरूरचा तलाठी देशमुख यांच्याकडे देण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजुर करण्यासाठी व वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी आणण्यासाठी तलाठी देशमुख हे त्यांच्यासाठी व वरिष्ठांना देण्यासाठी 42 लाखांच्या लाचेची मागणी करीत होते. परंतु, तक्रारदारांना लाच देणे मंजुर नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने मे 2022 पासून एसीबीचे या लाचेच्या प्रकरणावर लक्ष होते. या तक्रारीनुसार एसीबीने पडताळणी केली. तक्रारदार यांच्या ट्रस्टच्या जागेचा एनए प्रस्ताव मंजुर करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयातून मंजुरी आणण्यासाठी तलाठी देशमुख यांनी 42 लाखांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
या कामात मदत करण्यासाठी स्वाती शिंदे ह्या 1 लाखांची मागणी करीत होत्या. त्याबरोबरच जागेचा प्रस्ताव पुढे पाठविण्यासाठी व जिल्हाधिकारी कार्यालयात मदत करण्यासाठी रंजना उमरहांडे यांनी पाच लाखांची मागणी केली. तर खासगी व्यक्ती अतुल घाडगे आणि निंबाळकर यांनी या प्रस्तावाची जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजुरी मिळवून देण्यासाठी व मदत करण्यासाठी 20 लाख रूपयांची मागणी केली. तसेच गुन्हा दाखल केलेल्या सर्व आरोपींनी लाच मागणीस सहाय्य करून प्रोत्साहन दिल्याचा एसीबीने केलेल्या चौकशीत हा प्रकार समोर आला. त्यानंतर आता आता बंडगार्डन पोलिस ठाण्यात पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.