लातूर-अंबाजोगाई महामार्गावर रेणापूर फाटा येथे रात्री ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात वाहनांचे नुकसान झाले आहे. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार या अपघातानंतर कार मधील दोघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकजण न्यायाधीश आहेत.
उद्धव वसंत पाटील असे त्यांचे नाव असून ते सध्या डिस्ट्रिक्ट अँड सेशन न्यायालय बीड येथे कार्यरत होते. ते मूळचे चाकूर तालुक्यातील आनसोंडा या गावचे रहिवासी आहेत.
त्यांचे वाहन चालक बळी नंदकुमार टमके (रा. अजनसोंडा खु., ता. चाकूर) यांचा देखील अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
अपघात एवढा भीषण होता की, ट्रक समोरून शंभर फुटावरून चुकीच्या दिशेने येत न्यायाधीशांच्या वाहनावर धडकला. घटनास्थळावरून ट्रकचालक पसार झाला आहे.
न्यायाधीश म्हणून वर्षभरापूर्वीच झाली होती निवड
न्यायाधीश उद्धव पाटील हे गत अनेक वर्षांपासून लातूर येथे वकिली करत होते. दरम्यान, त्यांची एक वर्षापूर्वीच न्यायाधीश म्हणून निवड झाली होती. सध्या बीड जिल्हा न्यायालयात ते न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. शनिवार- रविवार सुटी असल्याने ते गावाकडे रेणापूर-उदगीर मार्गावरून शुक्रवारी निघाले होते. मात्र, त्यांच्यावर काळाने घाला घातला.