वाळूची अवैध वाहतूक रोखणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील एका तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ही घटना घडली आहे.
या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरण मोरे (35) असे जखमी तलाठ्याचे नाव आहे. त्यांच्यावर नागपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवनी तालुक्यात वाळूची अवैध तस्करी सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार, पवनी तहसील कार्यालयाचे 1 नायब तहसीलदार व 2 तलाठ्यांचे एक भरारी पथक त्या भागात गेले होते. या पथकाने वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला रोखले. त्यावेळी अचानक ट्रॅक्टर चालक व मालकाने किरण मोरे यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. त्यात किरण मोरे गंभीर जखमी झाले.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सातखेडा इथे शुक्रवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी या घटनेप्रकरणी ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. तर ट्रॅक्टर मालक पंकज काटेखाये व चालक आशिष काटेखाये अद्याप फरार आहेत.
पूर्व विदर्भात सातत्याने होतात हल्ले
उल्लेखनीय बाब म्हणजे पूर्व विदर्भात दारू तस्कर तसेच वाळु माफीयांकडून पोलिस तसेच महसूल कर्मचाऱ्याच्या अंगावर वाहन घालून चिरडण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडतात. 5 वर्षांपूर्वी दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करांनी वाहनाची धडक देऊन थेट पोलिस उपनिरीक्षकालाच ठार केल्याची घटना घडली होती. छत्रपती चिडे असे मृताचे नाव होते. चंद्रपुरात दारूबंदी आहे. मात्र, या भागात दारू तस्करीचे अनेक प्रकार समोर आले.
चिडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलिस ठाण्यात कार्यरत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील मौशी चोरगावजवळ ते 4 जणांच्या पथकासह दारू तस्करीविरोधी गस्त घालण्यास निघाले होते. दरम्यान, दारूची तस्करी करणाऱ्या टोळीचे वाहन ढोरपामार्गे मौशी चोरगावजवळ आल्यावर चिडे व सहकाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडीचा वेग वाढवत थेट चिडे यांच्या अंगावरच घालण्याचा प्रयत्न केला. त्यात चिडे गंभीर जखमी झाले. सहकाऱ्यांनी चिडे यांना ब्रह्मपुरी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण दुर्दैवाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.