नागपूर : जिल्ह्यातील कुही तालुक्यातील पाचगावमध्ये असलेल्या सिल्वर लेक फार्म रिसॉर्टवर एका रंगारंग पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 13 तरुणी तोकड्या कपड्यात अश्लील नृत्य करीत होत्या. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रिसॉर्टवर छापा घातला.
या छाप्यात अश्लील नृत्य करणाऱ्या तरुणींना ताब्यात घेण्यात आले तर 24 मद्यधुंद आंबटशौकींना अटक करण्यात आली. पोलिसांनी विदेशी दारुसह 48 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे आंबटशौकीन असलेल्या धनाढ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कुही तालुक्यात पाचगामध्ये सिल्वर लेक फार्म रिसॉर्ट आहे. या हॉटेलचा मालकी हक्क राजबापू मुथईया दुर्गे (रा. नागपूर) याच्याकडे आहे. तर विपीन यशवंत अलोने (जगनाडे चौक, नागपूर) हा व्यवस्थापक आहे. या हॉटेलवर अश्लील नृत्य करण्यासाठी आरोपी भूपेंद्र ऊर्फ मॉन्टी सुरेश अणे (रा. रामटेक) हा तरुणींना करारपद्धतीने आणतो. गेल्या अनेक दिवसांपासून या हॉटेलमध्ये जवळपास २० तरुणी रात्रीच्या पार्टीत तोकडे कपडे घालून अश्लील नृत्य करून आंबटशौकीन ग्राहकांचे मनोरंजन करतात. तर ग्राहक नृत्य करणाऱ्या तरुणींवर पैसे उधळतात.
या अश्लील नृत्याची माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अतिरिक्त अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख ओमप्रकाश कोकाटे यांनी पथकासह रविवारी मध्यरात्री छापा घातला. यावेळी अश्लील नृत्य करणाऱ्या मुलींवर जवळपास २४ ग्राहक पैसे उधळून डान्स धरताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी डीजे बंद करून विदेशी मद्यासह ४८ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.