शीखांचे पहिले गुरु आणि शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांचा जन्मदिवस कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला असतो. या प्रसंगाची आठवण म्हणून दरवर्षी या दिवशी गुरु नानक जयंती साजरी केली जाते. यावर्षी गुरुनानक जयंती 27 नोव्हेंबर रोजी अर्थात आज साजरी होणार आहे. या दिवशी गुरुद्वारांमध्ये अखंडपाठ, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी गुरुद्वारांना सुंदर सजावट केली जाते आणि प्रकाश उत्सव साजरा केला जातो.
गुरु नानक जयंतीचा इतिहास
गुरू नानकजींचा जन्म 1469 मध्ये कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता असे मानले जाते. तेव्हापासून, दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी, शीख लोक त्यांचे पहिले धार्मिक गुरु गुरु नानक देव यांची जयंती साजरी करतात.
गुरु नानक जयंतीचे आयोजन
शीख धर्माच्या धार्मिक स्थळांमध्ये गुरु नानक जयंतीची तयारी अनेक दिवस आधीच सुरू होते. या दिवशी सकाळची सुरुवात अमृत बेलाच्या उत्सवाने होते. भजने गायली जातात, कीर्तन आणि कथा पाठ केल्या जातात. त्यानंतर प्रार्थना सभा आणि नंतर लंगरचे आयोजन केले जाते. लंगर झाल्यानंतरही दिवसभर कथा, कीर्तन सुरूच असते. या दिवशी लोक आपल्या घरी आणि गुरुद्वारांमध्ये दिवे लावतात आणि मिठाई देतात. रात्री गुरुद्वारावर रोषणाई केली जाते आणि दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो. रात्री गुरबानीनंतर कार्यक्रमाची सांगता होते.