काँग्रेसमधून निलंबित नरेंद्र जिचकार यांनी पश्चिम नागपुरातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या अर्जावरील आक्षेप छाननी समितीसमोरील सुनावणीत फेटाळण्यात आला. जिचकार हे सरकारी कंत्राटदार असल्याने त्यांच्या अर्जावर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर छाननी समितीसमोर सुनावणी झाली. जिचकार यांच्याकडून काल युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर त्यावरील निकाल राखून ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज प्रलंबित ठेवण्यात आला. आज छाननी समितीने त्यांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळले आणि जिचकार यांच्या निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला. तर विकास ठाकरे यांच्यासाठी धक्का आहे.
पश्चिममध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार व शहराध्यक्ष विकास ठाकरे तर भाजपकडून माजी आमदार व पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे रिंगणात आहेत. येथे काँग्रेसमधून निलंबित नरेंद्र जिचकार यांनी वर्षभरापासून निवडणुकीची तयारी केली. त्यांनी उमेदवारी अर्जही सादर केला. परंतु, ते सरकारी कंत्राटदार असल्याचा आक्षेप घेण्यात आल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज छाननी समितीने प्रलंबित ठेवला होता. त्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठलाही निर्णय घेतला नव्हता. त्यासंतर्भात नरेंद्र जिचकार म्हणाले, माझ्या निवडणूक अर्जातील माहितीवर घेण्यात आलेल्या आक्षेपांमध्ये काहीही तथ्य नव्हते. मी सरकारी कंत्राटदार असल्याचा त्यांचा दावा चुकीचा होता. मी सप्टेंबर महिन्यातच त्यातून बाहेर पडलो आहे. मला मिळणाऱ्या जनप्रतिसादामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे. त्यांना त्यांचा पराभव दिसायला लागल्याने हे दबावाचे तंत्र वापरले जात आहे. पण, सत्याचा विजय झाला आहे.भाजपने पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार विकास ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीत भाजपचे सुधाकर देशमुख यांना पराभूत केले होते.
सुधाकर कोहळे हे भाजपचे माजी आमदार आहेत. त्यांनी २०१४ मध्ये दक्षिण नागपुरातून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. परंतु २०१९ मध्ये त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. तेव्हापासून ते नाराज होते. नाराजी दूर करण्यासाठी त्यांना नागपूर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष करण्यात आले. परंतु त्यांची नाराजी दूर झाली नव्हती. आता त्यांना पश्चिम नागपूरमध्ये संधी देण्यात आली आहे. या मतदारसंघातील पक्षाचे संघटन आणि त्यांचे कुणबी असणे हे त्यांचे बलस्थान आहे. या आधारावर ते काँग्रेसच्या विद्यमान आमदाराचे आव्हान कसे पेलतात ते बघावे लागेल. तर काँग्रेसने पश्चिम नागपूरमध्ये विद्यमान आमदार विकास ठाकरे यांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे. ते लोकसभेत पराभूत झाले होते. परंतु त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिलेली लढत उल्लेखनीय ठरली होती.