Breaking News

निवडणुकीत घोळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हायकोर्टाची नोटीस

Advertisements

विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याची शंका व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून फडणवीस यांनी विजय प्राप्त केला होता. कॉँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची विनंती केली आहे. याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर उच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावत ८ मे पर्यंत जबाब नोंदविण्याचे आदेश दिले.

Advertisements

 

Advertisements

विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून हस्तक्षेप करण्यात आल्याचा आरोप करून काँग्रेसच्या विदर्भातील आठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या आहेत. निवडणूक रद्द करून ती नव्याने घेण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणुकीला सुद्धा आव्हान देण्यात आले आहे. फडणवीस यांच्या व्यतिरिक्त दक्षिण नागपूरचे भाजपचे आमदार मोहन मते यांनाही न्यायालयाने समन्स बजावले. दक्षिण नागपूरचे कॉँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी मते यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली आहे. याशिवाय चिमूरचे आमदार कीर्ती भांगडिया यांनाही न्यायालयाने समन्स बजावला आहे.

 

फडणवीसांवर आरोप काय?

निवडणुकीत कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे लागते. मात्र, ईव्हीएमने निवडणूक घेण्यापूर्वी या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नाही. ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते. याची कारणेही स्पष्ट करावी लागतात. तेसुद्धा केले नाही. एवढेच नव्हे तर ईव्हीएमने निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशनसुद्धा निवडणूक आयोगाने काढले नसल्याचा आरोप याचिकाकर्ते गुडधे यांनी याचिकेत केला. निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत उमेदवारांनी मागणी केल्यानंतरही सीसीटीव्हीचे फुटेज, फॉर्म नंबर १७ दिले जात नाही. पाच व्हीव्हीपॅटची फेरमोजणी करण्यास मान्यता आहे. अनेकांनी याकरिता पैसे भरले आहेत. मात्र, व्हीव्हीपॅटची मोजणीसुद्धा केली जात नाही, असेही याचिकेत नमूद करण्यात आले.

 

मुनगंटीवारांनाही समन्स

उच्च न्यायालयाने आमदार सुधीर मुनगंटीवार, देवराव भोंगळे (दोन्ही भाजप) व मनोज कायंदे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना समन्स जारी करून तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमधून विजयी झालेले मुनगंटीवार यांच्याविरुद्ध संतोषसिंग रावत (काँग्रेस), राजुरा येथून जिंकलेले भोंगळे यांच्याविरुद्ध सुभाष धोटे (काँग्रेस) तर, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून विजयी झालेले कायंदे यांच्याविरुद्ध डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शेतरस्ता अडविल्यास गुन्हा : आधार कार्ड होणार ‘ब्लॉक’

राज्यातील ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी आणि शेतीमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक …

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *