गृहमंत्र्यांनी कारागृहातील कैद्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे कारागृहात पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा व भोजन व्यवस्थेचा आढावा घेतला.
नागपूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपूर मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. या भेटीत त्यांनी कैद्यांशी संवाद साधला. अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह व सुधार सेवा) सुनील रामानंद, पोलीस उपायुक्त विनिता साहू उपस्थित होते. नागपूर कारागृहाची क्षमता 1800 असून सध्या कारागृहात 1750 कैदी आहेत. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी कारागृहात शक्य त्या सर्व दक्षता घेण्यात येत आहेत. राज्यात कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर अंडर ट्रायल व सात वर्षे शिक्षा झालेल्या कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत राज्यात असलेल्या 37 हजार कैद्यांपैकी 11 हजार कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. कोरोनाचा शिरकाव कारागृहातही झाला असून राज्यात 411 कैदी पॉझिटिव्ह निघाले आहेत. यापैकी 281 कैद्यांना सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे 162 कारागृह अधिकारी – कर्मचारी यांनासुध्दा कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी 90 अधिकारी कर्मचाऱ्यांना उपचारार्थ सुटी देण्यात आली आहे. नागपूर कारागृहात 41 कैदी व 56 अधिकारी – कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर क्वारंटाईन केंद्रात उपचार सुरु आहेत. कारागृह प्रशासनाने राज्यातील 27 जिल्ह्यात 37 तात्पुरते कारागृह उभारले असून त्या ठिकाणी 2665 कैद्यांना ठेवण्यात आल्याची माहिती श्री. रामानंद यांनी दिली. कारागृहातील बंदिवानाच्या आरोग्य तपासणीसाठी पाच डॉक्टरांची चमू असून नियमित तपासणी व स्क्रिनिंग करण्यात येते, असे कारागृह अधीक्षकांनी सांगितले. लॉकडाऊन काळात नागपूर कारागृहातील कैद्यांनी 70 ते 80 हजार कापडी मास्क तयार केले असून, मास्कच्या विक्रीतून 8 लाख रुपयाचे उत्पन्न झाल्याचे कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी सांगितले. बंदिवानाच्या या कार्याची गृहमंत्र्यांनी प्रशंसा केली. यावेळी वरिष्ठ कारागृह अधिकारी विकास रजनलवार, दयानंद सोरटे व आनंद कांदे आदी उपस्थित होते.