सांगली येथील कार्यक्रमात नाम. जयंत पाटील यांचे डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह !
सांगली : कोरोना संसर्गाच्या भीतीने डॉक्टरांकडून रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होत नाहीत. अनेक ठिकाणी रुग्ण आत आणि डॉक्टर बाहेर, अशी स्थिती आहे. यामुळे मृत्यूदरात वाढ होत आहे. ही स्थिती अशीच सुरू राहिल्यास रुग्णालयांच्या बिलांसह डॉक्टरांच्या कामाचे ऑडिट करावे लागेल, असे मत सांगलीचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. खासगी रुग्णालयांकडून होणार्या रुग्णांच्या लुटीबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने सुरू केलेल्या कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते.
दक्षिण भारत जैन सभेने पुढाकार घेऊन सांगलीतील राम मंदिर परिसरात चोपडे हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड उपचार केंद्र सुरू केले आहे. १00 खाटांच्या कोविड केंद्राचे उद््घाटन रविवारी सकाळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना मंत्री जयंत पाटील यांनी डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, अनेक रुग्णालयांबद्दल तक्रारी वाढल्या आहेत. डॉक्टर बाहेर आणि पेशंट आत हे बरोबर नाही. डॉक्टर आतच जात नसतील तर उपचार कसे होणार? हा प्रकार गंभीर आहे. मी यावर कधी बोललो नाही, पण आता मृत्यू दर कमी येत नसल्याने यावर बोललेच पाहिजे. रुग्णांची काळजी डॉक्टरांनी घेतली तरच मृत्यू दर कमी होईल. ऑडिट बिलांचेच नव्हे तर डॉक्टरांचेही करण्याची गरज आहे. याबाबत आमच्यासह डॉक्टरांनीही आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
खासगी रुग्णालयांकडून होणार्या लुटीवरही मंत्री पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, उपचाराच्या नावाखाली खासगी रुग्णालये भरमसाठ पैसे उकळतात. रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनेक तक्रारी येत आहेत. लुटीच्या भीतीने लोक आजार दडवतात. उपचारात टाळाटाळ केल्याने अत्यवस्थ स्थितीतील रुग्णाला अखेरच्या क्षणी रुग्णालयात दाखल केले जाते. वेळ निघून गेल्यामुळे अत्यवस्थ रुग्णांचा मृत्यू होतो. यातून वाढणारा मृत्यूदर रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांना प्रामाणिकपणे काम करावे लागेल.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, गेल्या दोन महिन्यांमध्ये ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. सांगली जिल्हय़ात रोज ८00 ते ९00 रुग्ण आढळत आहेत. सरकार आपल्या परीने काम करीत आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जिल्हय़ात ५२ रुग्णालये सुरू झाली आहेत. व्हेंटिलेटर, खाटा आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारी यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. सांगली जिल्हय़ाचा मृत्यूदर राज्यात सर्वात जास्त आहे. हा मृत्यूदर कमी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. रुग्णांनी आजार अंगावर काढण्याऐवजी वेळीच उपचार घ्यावेत. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, चोपडे हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर यांच्यासह नर्सिंग स्टाफ उपस्थित होता.