Advertisements

कोरपना ता.प्र.:-
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या केंद्र स्थानी विराजमान माणिकगड सिमेंट कंपनीच्या डस्ट(धुळी)मुळे शहरवासी विशेषतः साईशांती नगरवासी पुरते हैराण झाले असून घरांच्या छतांवर व घरात परिसरात धुळीचे साम्राज्य असून धुळी प्रदूषणामुळे कित्येक नागरिक विविध प्रकारच्या रोगांनी ग्रासले आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने यांची भूमिका संशयास्पद बनली आहे.माणिकगड सिमेंट कंपनीतून पसरत असलेल्या सततच्या डस्टने कंटाळून स्थानिक प्रभाग क्रमांक २ साई शांतीनगर येथील रहिवासी कमालीचे आक्रमक झाले आहे.सदर कंपनीतून नेहमीच कणीदार धुर निघत असतो यामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या रोगांची लागण होत आहे.परिसरातील शेत पिकांचे सुद्धा मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे.मात्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने याविषयी अघोषित डोळेझाक केल्याचे दिसते.कित्येक लोकप्रतिनिधी आले-गेले परंतु सदर समस्या सोडविण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यास यांनी धन्यता दाखवली नाही,ही शोकांतिका असून शेवटी शासन- प्रशासन,लोकप्रतिनिधी माणिकगड कंपनीपूढे हतबल का ? हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे.
याबाबत जिल्हा प्रदूषण विभागाकडे अनेकदा तक्रारी करून व प्रत्यक्ष भेटून सुद्धा सदर कंपनी विरोधात कुठलीच कारवाई झालेली नाही.तक्रार केल्यानंतर आता प्रथमतः २० आक्टोंबर २०२० रोजी प्रदुषण मंडळाने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावून ७ दिवसात उत्तर मागितल्याची माहिती आहे.असे असताना उत्तर तर दिलेच नाही उलट धुळीचा वर्षा वेगाने वाढल्याचे दिसून येत.अशा मुजोर कंपनीवर जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ कुठलीच कारवाई करत नसल्याचे लक्षात घेऊन यांची कंपनी सोबत साठगाठ असल्याचे निश्चित होते.असे आरोप साईशांती नगरवासीयांनी केले आहे.याविषयी उच्च स्तरीय समिती नेमून चौकशी करावी,कंपनी सोबत संगनमत करून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे अधिकारी तसेच कंपनी विरुद्ध कठोर कारवाई करावी,धुळी प्रदुषण कायमचे बंद करावे अशी मागणी वजा विनंती नगरसेवक अरविंद डोहे, माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे, एम. व्ही.मुसळे,एम.जी.कारेकर,दौलत गीरडकर, पवन राजूरकर,महेन्द्र ताकसांडे,महादेव कळसकर,सौ.इंदीरा पाचबाई,अनंता रासेकर यंच्यासह १०३ साईशांती नगराच्या रहिवासीयांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ विभाग मुंबई यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
सोबतच पर्यावरण,वन,जलवायू परिवर्तन मंत्री प्रकाश जावडेकर नई दिल्ली,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबई,चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार,अप्पर मुख्यसचिव पर्यावरण मुंबई,जिल्हाधिकारी चंद्रपूर,माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार,राजूराचे आमदार सुभाष धोटे,प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर,उपप्रादेशिक प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, व्यवस्थापक अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड युनिट माणिकगड सिमेंट वर्क गडचांदूर यांनाही निवेदन पाठवण्यात आले असून आतातरी माणिकगड सिमेंटच्या डस्ट विषयी काहीतरी सकारात्मक घडेल आणि विनाकारण होणारा मनस्तापा पासून सुटका मिळेल अशी आशा साईशांती नगरवासीयांनी बाळगल्याचे दिसत आहे.
Advertisements