स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपण देत असलेली सेवा अमूल्य
Ø डॉक्टर आणि आरोग्य कर्मचा-यांप्रति पालकमंत्र्यांनी व्यक्त केली कृतज्ञता
Ø पालकमंत्री सुनिल केदार यांचा सेवाग्राम, सावंगी व सामान्य रुग्णालयालातील डॉक्टरांशी संवाद
वर्धा, दि.4 (जिमाका): महाराष्ट्र दिनी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी सेवाग्राम, सावंगी आणि सामान्य रुग्णालयाला भेट देऊन कोविड रुग्णांवर उपचार करीत असलेल्या डॉक्टर व रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य सेवेतील सर्व कर्मचा-यांचे आभार मानले. कोरोना युद्धात आपण अनेक रुग्णांचे प्राण वाचवून त्यांना जीवनदान देत आहात. ही अत्यंत अमूल्य सेवा आहे. कोरोना वार्डात काम करणे अतिशय जोखमीचे आहे. साधा मास्क लावला तरी माणसाला गुदमरल्यासारखे होते, आपण मात्र अत्यंत जोखमीच्या ठिकाणी, संसर्गाची भीती असतानाही, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बारा तास पी पी ई किटमध्ये काम करता. आपल्या या सेवेबद्दल शासन म्हणून मी कृतज्ञ आहे, असे श्री केदार यावेळी डॉक्टरांशी बोलताना म्हणाले.
डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या सुविधेबाबत आपले काही मागणे असल्यास तसे स्पष्टपणे सांगावे असेही श्री केदार म्हणाले. तसेच रुग्णांवर उपचाराबाबत काही कमी किंवा चुका होत असल्यास डॉक्टर व कर्मच्या-यांच्या वतीने त्यांनी स्वतः रुग्णांच्या नातेवाईकाची दिलगीरी व्यक्त केली आणि डॉक्टरांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी पालकमंत्री यांचे सोबत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले, सेवाग्राम आयुर्विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. नितीन गंगणे, कस्तुरबा गांधी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. पी. कलंत्री, सावंगी रुग्णालयाचे प्रशासकिय अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे तसेच सामान्य रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका वार्ड बॉय, व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.