चंद्रपूर, ता. ९ : शासन निर्देशानुसार ४५ पेक्षा अधिक वयोगट आणि १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरण केले जात आहे. त्यासाठी शहरात ठराविक ठिकाणी लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. आता ४५ वर्षावरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी आणखी २ नवीन केंद्र राखीव ठेवण्यात येणार असून, एकूण पाच केंद्राच्या माध्यमातून लसीकरण केले जाणार आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी दिली. विशेष म्हणजे १८ ते ४४ वर्ष वयोगटातील व्यक्तींना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे, त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
रविवारी (ता. ९) शहरातील लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी महानगर पालिकेच्या राणी हिराई सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, सहायक आयुक्त धनंजय सरनाईक आदींसह डॉक्टर आणि परिचारिका आदी उपस्थित होत्या.
चंद्रपूर शहरात १६ जानेवारीपासून ४५ पेक्षा अधिक वयोगट आणि २ मेपासून १८ ते ४४ वयोगतील लसीकरणाला प्रारंभ झाला. ४५ वर्षावरील नागरिकांसाठी केवळ दुसरा डोस देण्यासाठी शहरी नागरी आरोग्य केंद्र १, इंदिरानगर, गजानन महाराज मंदिर, मातोश्री शाळा, तुकुम आदी केंद्र राखीव होते. सध्या अंदाजे २५ हजाराच्या आसपास नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी आणखी २ केंद्र राखीव करण्यात येणार आहेत. यात रवींद्रनाथ टागोर स्कूल (विठ्ठल मंदिर वार्ड), सावित्रीबाई फुले कॉन्व्हेंट (नेताजी चौक, बाबूपेठ) या केंद्राचा समावेश असेल. गर्दी टाळण्यासाठी लसिकरण केंद्रावर वेगवेगळया रंगाचे टोकन वितरित करण्यात येणार आहे. सामाजिक अंतर ठेवण्यासाठी केंद्रावर वर्तुळ किंवा चौकट करण्यात येणार असून, जे नागरिक यात उभे राहणार नाहीत, त्यांना टोकन मिळणार नाही. ज्यांना टोकण प्राप्त होणार नाही, त्यांनी केंद्रावर थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या १८ ते ४४ वयोगतील लसीकरणासाठी रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा, दवा बाजार जवळ, रामनगर, पंजाबी सेवा समिती, विवेकनगर, एनयुएलएम ऑफिस, ज्युबिली हायस्कूलच्या समोर सत्र घेण्यात आले. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरण सुरु झाल्यानंतर लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊन गोंधळ वाढण्याची शक्यता असल्यानं या वयोगटाला नोंदणी आवश्यक आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ‘कोविन’ या अधिकृत वेबसाईटवरूनच करावी. ऑनलाईन नोंदणी झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरून जी वेळ देण्यात आली आहे, त्याच वेळेत त्यांनी उपस्थित राहावे. केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, हे लसीकरण झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला ३० मिनिटे केंद्रावरच थांबायचे आहे. यावेळी आपल्या मोबाईलवरून लसीकरण केल्याचे ई- प्रमाणपत्र स्वतःच डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहनही महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.