बल्लारपुरात 100 खाटांचे कोरोना उपचार केंद्र लोकार्पित
– मुनगंटीवारांच्या आमदार निधीतून दोन रूग्णवाहिका
चंद्रपूर,
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीने रूग्णांना उत्तम आरोग्य सुविधा पुरविणे ही प्राथमिकता असून, बल्लारपूर शहरानजिक भिवकुंड विसापूर येथील सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीत 100 खाटांचे कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. लवकरच बल्लारपूर तालुका क्रिडा संकुलात 100 खाटांचे डीसीएचसी रूग्णालय सुरू होईल. यात 70 सध्या खाटा, तर 30 प्राणवायू खाटा असतील. हवेतून प्राणवायू घेणारा संच लवकरच बल्लारपूर नजिक उभारणार असल्याचे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा वित्तमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
नागरिकांनीसुध्दा नियमांचे पालन करत आपली व कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सोमवार, 10 मे रोजी बल्लारपूर शहरानजिक भिवकुंड विसापूर येथील सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीत 100 खाटांचे कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासह बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, मुख्याधिकारी विजय सरनाईक, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, काशिसिंह, निलेश खरबडे, समिर केने, मनिष पांडे यांची उपस्थिती होती.
आ. मुनगंटीवार यांच्या स्थानिक विकास निधीतून 2 रूग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या. या रूग्णवाहिकांच्या चाव्या नगराध्यक्ष हरीश शर्मा यांना सुपुर्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे 100 पीपीई किटचे वितरणसुध्दा करण्यात आले. बल्लारपूरसाठी आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने 10 प्राणवायू कॉन्स्ट्रेटर उपलब्ध करण्यात आले आहे. बल्लारपूर शहर व तालुक्यातील नागरिकांना चाचण्यांचा लाभ सहज घेता यावा यादृष्टीने बल्लारपूर शहरात आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दुसरे आरटीपीसीआर चाचणी केंद्रसुध्दा सुरू करण्यात आले आहे. हरीश शर्मा यांनी यावेळी आ. मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.
