रासायनिक खते व पेट्रोल,डिझेल दरवाढ तात्काळ कमी करावी
* विदर्भ राज्य आंदोलन समितीची मा.पंतप्रधान यांचेकडे मागणी
चंद्रपूर –
नुकतीच जाहीर करण्यात आलेली रासायनिक खतांची दरवाढ केंद्र सरकारने तात्काळ कमी करावी आणि दररोज सुरू असलेली डिझेल व पेट्रोलची दरवाढ तात्काळ थांबवावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पंतप्रधान मा.ना. नरेंद्र मोदी यांना आज दिनांक 18 मे ला चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन पाठवून केली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या खतांच्या किमतीमध्ये सरासरी 30 ते 40 टक्के दरवाढ केल्यामुळे शेतक -यांच्या उत्पादन खर्चात प्रचंड मोठी वाढ होणार आहे आणि शेतकऱ्यांची लुटमार होणार आहे. सर्वात जास्त वापरले जाणारे डीएपी खताचे दर 1200 रुपये बॅग वरुन थेट 1900 रुपये झाले आहेत. सुपर फॉस्फेट सह अन्य खतांचे दरही असेच मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ही शेतकर्यांची मोठी लूटमार असून या निर्णयाचा निषेध समितीने केला आहे. खताच्या किमतीतील 500 ते 700 रूपये दरवाढ ही जिवघेणी असल्यामुळे ती तात्काळ कमी करण्याचे निदेश खते व रसायने मंत्रालयाला यथाशिघ्र निर्गमित करण्यात यावे आणि रासायनिक खतांची दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी समितीने केली आहे.
सध्या दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या दरात व डिझेल पंपाव्दारे ओलीत करणा-या शेतक-यांच्या खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे डिझेल व पेट्रोलची दरवाढ तात्काळ थांबवावी,अशीही मागणी समितीने केली आहे. कोरोना या महामारीच्या संकटात शेतमालाचे व भाजीपाल्याचे भाव पडले असून ते निम्म्यावर आले आहेत तर खताच्या किमती दिडपटीने वाढल्यामुळे शेती व्यवसाय धोक्यात येणार आहे. आधीच खर्च भरून निघेल एवढे रास्त भाव मिळत नसल्यामुळे थकलेल्या कर्जापोटी शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. त्यावर नियंत्रण आणण्याकरिता व शेती व्यवसाय वाचविण्याकरिता खत व डिझेलची दरवाढ थांबविणे गरजेचे आहे.
शेतक-यांचे उत्पन्न डबल करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या केंद्र सरकारला शेतकरी आत्महत्याचे सत्र रोखण्यात अपयश आले आहे . त्यामुळे या रासायनिक खतांच्या व डिझेलच्या दरवाढीमुळे उत्पादन खर्चात वाढ होणार आहे. आधीच कर्ज परतफेड करण्यास असमर्थ असणा-या शेतक-यांना आत्महत्येच्या खाईतुन वाचविण्यासाठी तात्काळ रासायनिक खते व पेट्रोल – डिझेलच्या किमती कमी करण्याची मागणी वजा विनंती मा.ना.पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी,चंद्रपूर यांचे मार्फत पाठविलेल्या निवेदनातून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार अँड.वामनराव चटप,जिल्हाध्यक्ष किशोर पोतनवार,कार्याध्यक्ष किशोर दहेकर, विदर्भ सचिव मितीन भागवत, युवा आघाडी अध्यक्ष सुदाम राठोड, शहराध्यक्ष अनिल दिकोंडवार, कपिल ईद्दे, हिराचंद बोरकुटे, सुधीर सातपुते, अरुण नवले, गोपी मित्रा, रमेश नळे, प्रभाकर ढवस, अरुण वासलवार, प्रा.नीळकंठ गौरकार, तुकेश वानोडे, अँड.प्रफुल्ल आस्वले, डॉ.संजय लोहे, रमाकांत मालेकर, अँड.श्रीनिवास मुसळे यासह विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे.