पत्रकारांनी केली महसुल विभागाला मदत
– चोरट्या वाळूचा पकडला ट्रक
आर्वी-
पत्रकार मोबाईलवर चित्रफित काढून वाळू माफीयापर्यंत पोहचेल अशी व्यवस्था असा आरोप पत्रकारांवर लावण्यात येतो. येथील पत्रकारांनी तो आरोप जीव्हारी लागल्यागत चोरट्या वाळूचा ट्रक पकडून महसुल विभागाला मदत केली. आर्वीत वाळू तस्करीवर चर्चा सुरू असताना वाद निर्माण होऊन पत्रकारांवर आरोप करण्यात आले. येथील पत्रकारांनी हा आरोप खोडुन काढण्याकरिता वाळूची खुलेआम होत असलेली तस्करी उघडी पाडण्याचा निर्धार केला.
रात्री येथील शिवाजी ते गांधी चौक या वर्दळीच्या मुख्य मार्गावरील टावरी जनरल स्टोअर्स समोर एम.एच. 32 एजे 5025 या क्रमांकाचे वाहन चोरीची वाळू खाली करताना दिसले. पत्रकारांनी वाहन चालकाकडे वाळू वाहतुकाचा परवाना मागीतला तर तोही नव्हता. शिवाय खनिज महसुल सुद्धा भरल्याची पावती नव्हती. परिणामी तहसिलदार विद्यासागर चव्हाण यांना भ्रमणध्वनीवरुन माहिती देण्यात आली. नायब तहसीलदार विनायक मगर व अमोल कदम यांनी घटनास्थळी पोहोचून रेती जप्तीची कारवाई केली. अवैध रेतीची वाहतूक करणारे तहसील कार्यालयात लावण्यात आले. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे पत्रकारांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.