चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील मोदी सरकारला यशस्वीरीत्या ७ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याच उपक्रमांत गेल्या वर्षभरात कोरोना मृत्यू पावलेल्यांचा अंतिमसंस्कार महानगरपालिकेमार्फत करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार भेटवस्तू देऊन गुरुवार दि. ३ जून रोजी करण्यात आला.
या कार्मक्रमाला महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, शिव मोक्षधाम स्मशानभूमीचे अध्यक्ष अजय वैरागडे, सचिव श्याम धोपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा अंतिमसंस्कार चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत केला जात आहे. पठाणपुरा गेटबाहेर इरई नदीच्या काठावर शिव मोक्षधाम स्मशानभूमीत गेल्या वर्षभरात कोरोनाबाधीतांच्या मृतदेहावर त्यांच्या धर्मातील प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येते. महानगरपालिकेमार्फत लाकूड, डिझेल, पीपीए किट, बॉडी कव्हर आणि अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य मोफत पुरविण्यात येते. अशा दुःखद आणि भावनिक प्रसंगी मनपा जनतेच्या सोबत असल्याचे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले. म्युकरमॉयकोसिस आजार कोरोनापेक्षाही भयंकर असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले. यावेळी उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला. यापूर्वी शहरात लस घेतलेल्या नागरिकांना शुभेच्छा म्हणून N-95 मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. कार्यक्रमाला स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार, झोन २चे मुख्य स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, प्रवीण हजारे आदी उपस्थित होते.