विश्व भारत ऑनलाईन:
नागपूर येथील जामठा स्टेडियमवर विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून (व्हीसीए)तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, २३ सप्टेंबरला जामठा येथील स्टेडियमवर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा सामना खेळला जाणार आहे. नव्याने स्थापित केलेल्या एलईडी फ्लड लाइट्स अंतर्गत हा खेळ दिवस-रात्र खेळला जाईल. या स्टेडियमची क्षमता ४४ हजार प्रेक्षकांची आहे. जवळपास तीन वर्षांनंतर नागपुरात आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामन्याचे आयोजन होत आहे.
प्रेक्षकांसाठी पार्किंग
व्हीसीएने स्टेडियमजवळ पुरेशी मोफत पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. प्रेक्षकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन व्हीसीएने केले आहे. व्हीसीएने फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी ईस्ट स्टँड (तळमजला, बे A, B आणि C) मध्ये ४ हजार ४०० तिकिटे आरक्षित केली आहेत. तिकिटाची किंमत १०० रुपये ठेवली आहे. विद्यार्थी केवळ त्यांच्या संबंधित शाळांमधूनच तिकीट बुक करू शकतात. विद्यार्थ्यांची यादी, संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रमाणित करून विद्यार्थ्यांच्या शाळेच्या ओळखपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे.
संघाचे आगमन
संघांचे आगमन २१ ला, दुसऱ्या दिवशी सराव दोन्ही संघ २१ सप्टेंबरला चार्टर्ड विमानाने नागपुरात दाखल होणार आहेत आणि २२ सप्टेंबर रोजी त्यांचे सराव सत्र होईल. ऑस्ट्रेलियन संघ दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत सराव करेल, तर टीम इंडिया जामठा स्टेडियमवर फ्लडलाइट्सखाली सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत सराव करेल. सामन्याच्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता प्रेक्षकांसाठी गेट उघडले जातील. टर्न स्टाइलवर बार कोड स्कॅन केल्यानंतर तिकीटधारकांना स्टँडवर प्रवेश मिळेल.