सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळेल मदत
राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्यात येईल, असा दावा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (दि. २) केला.
२३ सप्टेंबर रोजी नागपूर महानगर व जिल्हयात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या नुकसानीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या परिसरातील पाहणी त्यांनी आज केली.
अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली होती. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नागपूर शहराचाही दौरा केला होता.
नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव असून त्यामुळे या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच अतिवृष्टी व बोगस रासायनिक खते वापरल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषीमंत्र्यांनी आज स्वतः शेताच्या बांधावर जात पाहणी केली. त्यांनी अडयाळी, उमरगाव, पाचगाव, विरखंडी या गावांना प्रामुख्याने भेटी दिल्या. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ठिकठिकाणी त्यांना शेतकरी बांधवांनी विविध मागणीची निवेदने सादर केली. अनेक ठिकाणी त्यांनी ताफा थांबवून पाहणी केली. जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्यांनी सोयाबीनवर आलेल्या ‘ पिवळ्या मोजाक व्हायरस ‘ या रोगामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली.सोयाबीनचे दाणे भरलेच नसल्याचे शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष त्यांना दाखविले. अनेक ठिकाणी अतिवृष्टीने संपूर्ण पीक वाया गेल्याने अक्षरशः उभ्या पीकावर रोटावेटर फिरवल्याची आपबीती शेतकऱ्यांनी सांगितली.