राजकारणातील समाजसेवक रमेशभाऊ कोतपल्लीवार

राजकारणातील समाजसेवक रमेशभाऊ कोतपल्लीवार

राजकारण हे भल्याभल्यांना जमले नाही. मात्र, राजकारणात येणाऱ्या व्यक्तीला समाजकारणाची झालर असेल तर त्या व्यक्तीमागील जनसंचय मोठा असतो. पूर्वी राजकारणात असलेल्या तत्ववादी लोकांना आताच्या राजकारणाशी जुळवून घेता आले नाही. त्यांनी आपली तत्त्वे सोडली नाही. तत्त्वाशी प्रामाणिक राहण्यासाठी राजकारणापासून दूर होणे पसंत केले. कधी काळी राजकारणात वर्चस्व गाजविणाऱ्या आणि समाजसेवा हेच व्रत स्वीकारणाऱ्या चंद्रपुरातील अशाच एका निगर्वी समाजसेवकाचे निधन मनाला चटका लावून गेले. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली राजकारणातील आणि समाजकारणातील पोकळी कधीच भरून निघणारी नाही.

राजकारणातील या समाजसेवकाचे नाव आहे रमेशभाऊ कोतपल्लीवार. सुसंकृतपणा, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि नि:स्वार्थ सेवा या त्रीसुत्रीचा अंगिकार करुन राजकारण आणि समाजकारण करणारे व्यक्तिमत्व म्हणून रमेशभाऊ कोतपल्लीवार यांची ओळख होती. त्यांनी राजकारणात कधीच तडजोड केली नाही. कणखर, कर्मठ आणि तितकेच संवेदनशील असलेल्या रमेशभाऊ कोतपल्लीवार यांनी राजकारणात आपल्या नेतृत्वाची आणि कर्तृत्वाची अमीट छाप सोडली. नगराध्यक्ष म्हणून आपली काय जबाबदारी आहे, याचे ते सतत भान ठेवत. प्रशासन चालविणारे अधिकारी यांचा त्यांनी सतत मान ठेवला. त्यांच्या ज्ञानाचा आदर आणि उपयोग करत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे करून घेतली.

दरम्यान, दोन दशकांपूर्वी वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाने चांगलाच जोर पकडला होता. चंद्रपुरात रमेशभाऊंच्या नेतृत्वात आंदोलन पेटले होते. महाविदर्भ राज्य संघर्ष समितीचे ते नेते होते. त्यांच्या नेतृत्वात मविसचा प्रभाव चंद्रपुरात वाढला. जनता पाठिशी उभी झाली. वेगळ्या विदर्भाच्या मागणीची ज्योत त्यांनी अखेरपर्यंत तेवत ठेवली.

रमेशभाऊ कोतपल्लीवार नगरसेवकपदाचे उमेदवार होते. रमेशभाऊ भानापेठ वॉर्डातून निवडून आले आणि चंद्रपूर नगरपरिषदेचे अध्यक्ष बनले. त्यांनी नगरपरिषदेच्या कारभार उत्तमरीतीने चालविला. नगराध्यक्ष म्हणून यशस्वी काम पाहिले. नगर परिषदेतील दैनंदिन जमा-खर्चाचा हिशोब घेतल्याशिवाय ते नगर परिषदेतून जात नसत, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. रमेशभाऊंच्या राजकारणाचा आणि समाजसेवेचा आमच्याही कुटुंबावर प्रभाव होता. रमेशभाऊ म्हणजे माझे मामेसासरे. संजय यांचे ते मामा. संजयना त्यांनीची राजकारणात आणले. रमेशभाऊंच्या सोबतीने संजय यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर पर्यायाने माझाही राजकारणात प्रवेश झाला. आमच्या दोघांच्याही राजकारणातील कारकिर्दीवर रमेशभाऊंचा प्रचंड प्रभाव आहे. त्यांनी आम्हाला पाजलेले राजकारणाचे बाळकडू आज चंद्रपूर महानगरपालिकेची महापौर म्हणून कार्य करताना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे ठरत आहे. यामुळेच महापौर पदाची धुरा सांभाळताना जनतेच्या हितार्थ आम्ही काही कठोर निर्णयही घेऊ शकलो.

राजकारण, समाजकारण यापलिकडे जाऊन रमेशभाऊंचा धार्मिकतेकडे कल होता. चंद्रपूरचे साई मंदिर आज प्रख्यात आहे. हे साई मंदिर उभे व्हावे यासाठी त्यांनी ५० वर्षापूर्वी संकल्प केला होता. जोपर्यंत साईबाबा मंदिर निर्माण होणार नाही, तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही, असा प्रण त्यांनी केला होता. हा प्रण त्यांनी पूर्ण केला. मंदिरकार्य पूर्ण होताच साईबाबा मंदिर विश्वस्त मंडळात सचिव म्हणूनही त्यांनी काही वर्षे जबाबदारी पार पाडली. आर्यवैश्य समाजातील उपवर-उपवधू परिचय मेळावे त्यांनी आयोजित केले. बाबा महाराज सातारकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित करत सामाजिक कार्यात आपले योगदान दिले.

जटपुरा गेटजवळील वसंत भवनसमोर जिल्हा परिषदेने १९७० मध्ये माजी मुख्यमंत्री मा. सां. कन्नमवार यांचा पुतळा उभारला. त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अब्दुल शफी होते. याच वर्षी महात्मा गांधी जन्मशताब्दी समिती गठीत करण्यात आली. त्याचे अध्यक्षही अब्दुल शफी होते, तर रमेशभाऊ सचिव होते. त्यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून पुतळ्या सभोवताल वॉल कम्पाउंङ करून दिले होते.

हक्कासाठी जर कुठल्या गोष्टीचा पाठपुरावा करायचा असेल तर तो कसा असू शकतो, याचा एक चांगला किस्सा रमेशभाऊंच्या बाबतीत नेहमीच चर्चिला जातो. कमलनाथ केंद्रीय कोळसा मंत्री होते, तेव्हा वेस्टर्न कोल्ड फिल्डचे मुख्यालय नागपूरातून जबलपूरला हलविण्याचा निर्णय कोळसा मंत्रालयाने घेतला. भंडाऱ्याचे फॉरवर्ड ब्लॉकचे नेते आणि चंद्रपूरचे महाविदर्भ संघर्ष समितीचे निवडून आलेले नगराध्यक्ष रमेश कोतपल्लीवार रामनगरमधील शासकीय विश्रामगृहात भाऊ जांबुवंतरावांना भेटले. वस्तुस्थिती सांगितली. भाऊंनी थेट इंदिराजींना कॉल लावून भेटीची वेळ व तारीख मागितली होती. ठरल्याप्रमाणे ते दिल्लीला रवाना झाले. पंतप्रधान कार्यालयात गेले. ब्रिटीश काळापासून आजतागायत नागपूर येथे असलेले वेकोफिचे कार्यालय नागपुरातून हलविण्याचे कारण काय, हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. चंद्रपूर, वणी परिसरातील कोळसा उत्पादनाची आकडेवारी मांडली. तेव्हा मोठा वादही झाला. अखेर वेकोफिचे मुख्यालय सिव्हील लाईन्स, नागपूर येथेच कायम राहिले.

रमेशभाऊ कोतपल्लीवार यांनी शरद पवारांच्या नेतृत्त्वाचा स्वीकार केला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळले. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा त्यांच्यावर अतिशय विश्वास होता. या विश्वासानेच शरद पवार यांनी रमेशभाऊंना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोपविले. परंतु, राजकारणातील बेबंदशाही रमेशभाऊला कधीच पसंद आली नाही. भ्रष्टाचार कधी सहन झाला नाही. बदलत्या राजकारणाशी त्यांना जुळवून घेता आले नाही. म्हणूनच हळूहळू त्यांनी राजकारणाशी फारकत घेतली आणि साईबाबा मंदिरात आपली सेवा देऊ लागले.

कुठल्याही राष्ट्रीय आपत्तीत या देशाचा सच्चा नागरिक म्हणून त्यांनी नेहमीच आपले योगदान दिले. देशभरात कोरोनाचे संकट बघता आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याने केंद्र सरकारसह राज्य सरकारने मदतीचे आवाहन केले. यात रमेशभाऊ कोतपल्लीवार यांनी ५१ हजार रू.चा धनादेश मदत निधीकरीता दिला.

रमेशभाऊंनी नुकताच २७ एप्रिल रोजी ८० वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र ३ जून रोजी निधन झाले. साईबाबांचे निस्सीम भक्त असलेल्या रमेशभाऊंची प्राणज्योत गुरुवारीच मालवली. त्यांच्या जाण्याने राजकारणाची समज व दूरदृष्टी असलेला एक समाज प्रबोधनकार गमावला. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणात सदा न कदा अग्रेसर राहणाऱ्या रमेशभाऊंच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून निघणे कदापि शक्य नाही. त्यांचे कार्य आणि नेतृत्व हे प्रत्येक पिढीसाठी आदर्श ठरेल असेच आहे. आज रमेशभाऊ आपल्यात नसेल तर त्यांच्या कर्तृत्वाने ते नेहमीच चंद्रपूरकरांच्या मनात घर करून राहतील, एवढे मात्र नक्की. चंद्रपूरच्या या भूमिपुत्रास अखेरचा सलाम…!

देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी बाजपेयी यांच्या कवितांच्या या ओळींनी रमेशभाऊंना माझी श्रद्धांजली…

क्या हार में, क्या जीत में
किंचित नहीं भयभीत मैं
कर्तव्य पथ पर जो भी मिला
यह भी सही, वो भी सही
वरदान नहीं मांगुंगा
हो कुछ पर, हार नहीं मानूंगा…!

– राखी संजय कंचर्लावार
महापौर, चंद्रपूर

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *